आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे लिलाव पार पडतो आहे. पहिल्या दिवसाच्या लिलावात पहिल्याच सत्रामध्ये आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडलेले पहायला मिळाले. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएलमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनऊ सुपरजाएंट संघाने 27 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात विकत घेतलं आहे.
ऋषभ पंत हा आतापर्यंत आयपीएल दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत होता. या संघाचं ऋषभ पंतने नेतृत्वही केलं. परंतु गेले काही हंगाम या संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. ज्यामुळे आगामी हंगामाकरता दिल्लीने पंतला आपल्या संघात कायम राखलं नव्हतं. परंतु RTM कार्डाची सोय असल्यामुळे दिल्ली पंतला पुन्हा एकदा संघात स्थान देईल असा अंदाज लावला जात होता.
2 कोटींच्या मुळ किमतीवर पंतसाठी सुरु झाली बोली -
ऋषभ पंतसाठी 2 कोटींच्या बेस प्राईजवर लिलावाला सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनीटांतच त्याच्यासाठी संघांमध्ये चांगलीच जुंपलेली पहायला मिळाली. प्रत्येक संघमालकाला पंत आपल्याकडे हवा होता. परंतु लखनऊ सुपरजाएंटने स्पर्धेत उडी घेत पंतसाठी बोली वाढवायला सुरुवात केली. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचे संघमालकही पंतसाठी बोली लावत त्याला आपल्या संघात राखण्यासाठी धडपडताना दिसले. या द्वंद्वात पंतच्या बोलीने 20 कोटींचा टप्पा गाठला.
हे ही वाचा - IPL 2025 Auction : एका तासात 110 कोटी खर्च, बॉलर्सचा वरचष्मा मोडत फलंदाजांनी गाजवला दिवस
लखनऊ माघार घ्यायला तयार नव्हतं -
पंतच्या बोलीने 20 कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतरही लखनऊचा संघ माघार घ्यायला तयार नव्हता. अखेरीस लखनऊ सुपरजाएंट संघाने लावलेल्या 20.75 कोटींच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्सने RTM कार्ड वापरुन पंतला आपल्या संघात घ्यायची तयारी दाखवली. परंतु नवीन नियमांप्रमाणे लखनऊला पुन्हा एकदा पंतवर बोली लावण्याची संधी मिळाल्याने त्यांनी पंतची बोली वाढवून थेट 27 कोटींच्या घरात नेऊन ठेवली.
लखनऊने बंपर बोली लावल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला आपल्या पर्समधली उर्वरित रक्कम पाहून माघार घ्यावी लागली आणि पंत अखेरीस 27 कोटींच्या बोलीवर लखनऊच्या संघात दाखल झाला.
दिल्ली ते लखनऊ...पंतची कमी काळात मोठी कमाई -
2016 साली दिल्ली कॅपिटल्सने 1.90 कोटी खर्च करत पंतला आपल्या संघात घेतलं होतं. त्यानंतर पंतने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केलं. ज्यानंतर 2022-2023 साठी दिल्लीने पंतला 16 कोटी मोजले होते. ज्यानंतर आजच्या लिलावात पंतला 27 कोटींची बोली लागली आहे. त्यामुळे IPL मध्ये पंत आपली नवीन इनिंग कशी खेळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.