भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएलचा हंगाम मध्येच स्थगित करावा लागला होता. पाकिस्तानी सैन्याकडून सीमेलगत असलेल्या राज्यांवरील हल्ल्याची भीती लक्षात घेता बीसीसीआयने हा निर्णय घेतला होता. परंतु हा तणाव निवळल्यानंतर आयपीएलचा उर्वरित हंगाम आता पुन्हा एकदा खेळवला जाणार आहे.
कधी सुरु होणार आयपीएलचा स्थगित झालेला हंगाम?
17 मे रोजी IPL चा उर्वरित हंगाम खेळवला जाणार असून 3 जून रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
IPL 2025 चा हंगाम स्थगित केव्हा करण्यात आला होता?
9 मे रोजी बीसीसीआयने आयपीएलचा हंगाम स्थगित करण्याची घोषणा केली होती. धर्मशालाच्या मैदानावर पंजाब विरुद्ध दिल्ली सामना सुरु असताना ब्लॅकआऊट करण्यात आलं...ज्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करुन बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला.
किती शहरांत खेळवले जातील उर्वरित हंगामाचे सामने?
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील उर्वरित सामने हे जयपूर, दिल्ली, लखनऊ, मुंबई, अहमदाबाद आणि बंगळुरु या सहा शहरांत खेळवले जातील. प्ले-ऑफ्स आणि अंतिम सामना कुठे खेळवला जाईल याबद्दल मात्र बीसीसीआयने अद्याप निर्णय घेतला नाहीये.
IPL चा स्थगित हंगाम पुन्हा खेळवला जाणार असल्याचं कळल्यानंतर अनेक संघांनी आपल्या खेळाडूंना कँपमध्ये परत बोलावलं असून काही परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबद्दल मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अखेरच्या टप्प्यात आलेल्या आयपीएलच्या यंदाच्या हंगामात प्ले-ऑफची शर्यत अधिक चुरशीची झाली आहे. त्यामुळे यंदा कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्त्वाचं झालं आहे.