IND vs ENG : तुझ्याकडून 30 धावांची अपेक्षा नाहीये, माजी भारतीय खेळाडूने Karun Nair ला सुनावलं

आतापर्यंत खेळलेल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये करुण नायरने 21.83 च्या सरासरीने 131 धावा केल्या आहेत. काही सामन्यांमध्ये करुणने चांगली सुरुवात केली, परंतु त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या अँडरसर-तेंडुलकर कसोटी मालिकेत सध्याच्या घडीला भारतीय संघ 1-2 अशा पिछाडीवर आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजयाची संधी होती...परंतु महत्त्वाच्या फलंदाजांनी केलेली हाराकिरी आणि इंग्लंडच्या गोलंदाजांनी केलेला टिच्चून मारा या जोरावर इंग्लंडने हा कसोटी सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. 

भारतीय संघात मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन केलेल्या करुण नायरला भारतीय संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली. परंतू आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये एकदाही करुणला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. आतापर्यंत खेळलेल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये करुण नायरने 21.83 च्या सरासरीने 131 धावा केल्या आहेत. काही सामन्यांमध्ये करुणने चांगली सुरुवात केली, परंतु त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं.

हे ही वाचा - IND vs ENG: चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला धक्का, स्टार फास्ट बॉलर जखमी

भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनीअर यांनी करुण नायरच्या याच अपयशावर बोट ठेवलं आहे. तिसऱ्या क्रमांकावर खेळत असताना करुण नायरकडून संघाला 30 धावांची अपेक्षा नसल्याचं परखड मत इंजिनीअर यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.

करुण नायरकडून ही अपेक्षा नाहीये - इंजिनीअर

करुण नायर हे आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने 20 आणि 30 धावा केल्या आहेत. या खेळीदरम्यान त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह खेळून 30 धावा केल्या आहेत. परंतु तिसऱ्या क्रमांकावर खेळत असताना करुणकडून 30 धावांची अपेक्षा नाहीये. त्याच्याकडून शतकी खेळीची अपेक्षा आहे, त्याच्याकडून आणखी धावा निघणं गरजेचं आहे. त्याच्याकडून संघाला असलेल्या अपेक्षा या मोठ्या आहेत, असं इंजिनीअर म्हणाले.

Advertisement

तुमची इज्जत आता पणाला लागलेली आहे, इंजिनीअर यांचा सूचक इशारा -

पुढच्या कसोटी सामन्यासाठी आपण सर्वोत्तम प्लेइंग 11 निवडली पाहिजे. मी साई सुदर्शनला फारसं खेळताना पाहिलेलं नाहीये. तुम्हाला त्या-त्या क्षणी सर्वोत्तम खेळाडूंची निवड करणं गरजेचं आहे. कोणता खेळाडू तुम्हाला चांगल्या धावा काढून देऊ शकतो हे तुम्हाला ठरवावं लागेल...तुम्ही देशासाठी खेळत आहात, तुमची इज्जत इथे पणाला लागली आहे. त्यामुळे मी म्हणेन वय वगैरे गोष्टी विसरुन जा, जर साई सुदर्शन चांगला खेळाडू असेल तर त्याला संधी द्या, असंही इंजिनीअर यांनी स्पष्ट केलं.

करुण नायरचा खराब फॉर्म हा चिंतेचा विषय झालेला असताना पुढील कसोटी सामन्यात करुण नायरला संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या जागेवर साई सुदर्शनला संघात जागा मिळू शकते, साई सुदर्शनला पहिल्या सामन्यात संधी देण्यात आली होती, परंतू नंतर त्याला संघाबाहेर करण्यात आलं.

Advertisement

हे ही वाचा - Ravindra Jadeja Records : लॉर्ड्सवर रविंद्र जाडेजाची दमदार खेळी; 'हे' विक्रम केले नावे