
India Won 5th test, Mohammed Siraj: भारतीय क्रिकेट संघाने ओव्हल कसोटी 6 धावांनी जिंकून इतिहास रचला आहे. 93 वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाने परदेशी दौऱ्यात 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रथमच पाचवा कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम केला आहे. पाचव्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला 374 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 367 धावांवर बाद झाला. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयात मोहम्मद सिराजने अविस्मरणीय कामगिरी बजावली. त्याने संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी करत तब्बल 23 बळी घेतले. त्याने या मालिकेत 1000 पेक्षा जास्त बॉल फेकले. तो खऱ्या अर्थाने भारतीय संघाचा खरा योद्धा ठरला.
सिराजचा पराक्रम
मोहम्मद सिराज हा दोन्ही संघांमधील एकमेव गोलंदाज आहे ज्याने पाच कसोटी सामन्यांमध्ये 1,000 हून अधिक चेंडू टाकले. त्याने शेवटच्या कसोटीच्या पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. पहिल्या डावात त्याने सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या जॅक क्रॉलीला बोल्ड करून विजयाची आशा निर्माण केली. त्यानंतर, दुसऱ्या डावात सुरुवातीच्या षटकांमध्येच दोन बळी घेऊन त्याने सामन्याचे पारडे फिरवले. शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात सिराजने विजय मिळवून देणारी गोलंदाजी केली. भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ॲटकिन्सनला शेवटचा बळी घेऊन भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
सिराज ठरला टीम इंडियाचा खरा योद्धा
जो रूटने सिराजला 'योद्धा' म्हटले आहे. तो म्हणाला, "तो खरा योद्धा आहे, ज्याला तुम्ही तुमच्या संघात सामील करू इच्छित असता. तो भारतासाठी सर्वस्व पणाला लावतो." भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांनी त्याच्या उत्साहाचे कौतुक केले. मोर्केल म्हणाले, "सिराजला भारताची जर्सी घालायला खूप आवडते. प्रत्येक वेळी तो प्रेक्षकांकडे वळून त्यांना ओरडायला सांगत असतो." दक्षिण आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाने पुढे सांगितले की, "चांगल्या पंचांच्या निर्णयावर टाळ्या वाजवणे एखाद्या लहान मुलासारखे वाटते, आणि आपल्या सहकाऱ्यांच्या बळींचा आनंद साजरा करण्यात एक पावित्र्य जाणवते." सिराज नेहमी या गोष्टी करतो असंही त्यांनी सांगितलं.
अविस्मरणीय मालिका
तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी ही अलीकडच्या काळातील सर्वात अविस्मरणीय कसोटी मालिकांपैकी एक मानली जाईल. त्यात नाट्य, हृदयद्रावक क्षण, उत्कृष्ट शतके आणि आश्चर्यकारक उलथापालथ झाल्याचे क्रिकेट रसिकांनी पाहिले. पण कदाचित या मालिकेमुळे आपल्याला काहीतरी अधिक अविस्मरणीय मिळाले असेल, ते म्हणजे मोहम्मद सिराज, ज्याला एक अशी मालिका मिळाली जी तो नेहमी सर्वांच्यात लक्षात राहील. सिराजसाठी ही मालिका मोलाची ठरली आहे. मिळालेल्या संधीचे त्याने खऱ्या अर्थाने सोने केले. बुमराच्या अनुपस्थितीमध्ये त्याने भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व केले. नुसते नेतृत्व केले नाही तर मोक्याच्या क्षणी सामन्याला कलाटणी देणाऱ्या विकेट्स ही घेतल्या.
IND Vs ENG: ओव्हल टेस्टमध्ये राडा! के एल राहुल थेट पंचांना नडला; पाहा VIDEO
सिराजची पहिली प्रतिक्रीया काय?
इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात विजय मिळावल्या बद्दल महम्मद सिराजने आनंद व्यक्त केला आहे. कोणत्याही परिस्थिती मी मॅच जिंकवून देऊ शकतो हा मला विश्वास होता असं मोहम्मद सिराज म्हणाला. ज्यावेळी इंग्लंडचे केवळ तीनचं बॅट्समन आऊट झाले होते त्यावेळी ही मला आत्मविश्वास होता. आपण इंग्लंडच्या बॅट्समनला आऊट करू शकतो. त्यानुसार त्यांना बादही केले. पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात दोन विकेट घेतल्यानंतर आपण हा सामना जिंकू शकतो असा आत्मविश्वास आणखी वाढला असं ही त्याने सामना जिंकल्यानंतर सांगितलं.
सिराजने रचला इतिहास
- इंग्लंडमध्ये सर्वाधिक 4-बळी घेणारे आशियाई गोलंदाज
- मोहम्मद सिराजने जून 2002 नंतर इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजापेक्षा जास्त चेंडू टाकले आहेत.
- सिराजने इंग्लंडमध्ये 7 वेळा 4 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. तो इंग्लंडमध्ये असे करणारा पहिला आशियाई गोलंदाज बनला आहे. असे करून त्याने मुथय्या मुरलीधरनचा 6 वेळा 4 बळी घेण्याचा विक्रम मोडला आहे.
मालिकेतील सिकंदर: सिराजची कामगिरी
- 23 बळी
- 185.3 षटके
- सर्व 5 कसोटी सामने खेळला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world