जाहिरात

मुंबईला रामराम, पृथ्वी शॉ स्थानिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळणार

शॉच्या नेतृत्वाखाली भारताने 2018 साली अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 13 शतके आणि 4500 हून अधिक धावा आहेत.

मुंबईला रामराम, पृथ्वी शॉ स्थानिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळणार
पुणे:

भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि युवा स्टार पृथ्वी शॉ याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निरोप घेत, आगामी हंगामापासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून, महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाची ताकद यामुळे अधिक बळकट होणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पृथ्वी शॉने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचप्रमाणे, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने सातत्यपूर्ण व भरीव कामगिरी करत स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शॉच्या नेतृत्वाखाली भारताने 2018 साली अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 13 शतके आणि 4500 हून अधिक धावा आहेत.

आपल्या निर्णयाविषयी बोलताना पृथ्वी शॉ म्हणाला -

"कारकिर्दीतील या वळणावर मी एक क्रिकेटपटू म्हणून स्वतःची वाढ आणि विकासासाठी महाराष्ट्र संघाकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आजवर मला मिळालेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दल मी पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी राज्यभर विशेष प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग, वुमन्स एमपीएल, कॉर्पोरेट शील्ड, डी.बी. देवधर ट्रॉफी यांसारखे उपक्रम ही त्याची साक्ष आहेत.त्यामुळे मला विश्वास आहे की, अशा प्रेरणादायी वातावरणात खेळल्याने माझ्या कारकिर्दीला नवे वळण मिळेल व क्रिकेटपटू म्हणून अधिक प्रगती करू शकेन. तसेच ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, रजनीश गुर्बानी आणि मुकेश चौधरी यांसारख्या गुणवान खेळाडूंसोबत महाराष्ट्र संघात खेळण्याची संधी मिळेल, याचा मला आनंद आहे."

पृथ्वी शॉ चं जर्सी देऊन रोहित पवार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं.

पृथ्वी शॉ चं जर्सी देऊन रोहित पवार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं.

रोहित पवारांकडून पृथ्वी शॉ चं महाराष्ट्र संघात स्वागत - 

"भारतीय संघाचे सर्व फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व केलेला स्टार खेळाडू पृथ्वी शॉ यांनी महाराष्ट्र संघात खेळण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्हीत्यांचे स्वागत करतो. आमच्या संघात ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, मुकेश चौधरी, रजनीश गुरबाणी यांसारखे अनुभवसंपन्न व नवोदित खेळाडू आहेत. अशा वेळी पृथ्वी शॉसारख्या ऑल-फॉरमॅट खेळाडूची भर पडल्यामुळे महाराष्ट्र संघ अधिक भक्कम होईल, याची आम्हाला खात्री आहे. पृथ्वी शॉने आतापर्यंत भारतीय संघात व आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याचा अनुभव व आक्रमक खेळ नव्या पिढीच्या क्रिकेटपटूंना मार्गदर्शक ठरेल.पृथ्वी शॉ याला महाराष्ट्र संघात सामावून घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आमच्या अपेक्स कमिटी आणि सीएसी कमिटीचे आभार मानतो. तसेच त्याच्या आगामी कारकिर्दीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पूर्णपणे पाठीशी उभा राहणार आहे."

हे ही वाचा - Vaibhav Suryavanshi : 14 वर्षांच्या वैभवची बॅट इंग्लंडमध्ये गरजली, 10 सिक्सह केला कुणालाही न जमलेला रेकॉर्ड

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने अलिकडच्या काळात विविध स्पर्धा व उपक्रमांद्वारे राज्यातील क्रिकेटची व्याप्ती वाढवण्याचे कार्य हाती घेतले आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांनी नव्या क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून दिले आहे. याच पार्श्वभूमीवर पृथ्वी शॉचा महाराष्ट्र संघात समावेश होणे, हे राज्याच्या क्रिकेटसाठी एक नवे पर्व ठरेल.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डी.बी. देवधर टूर्नामेंट या दर्जेदार स्पर्धेतही पृथ्वी शॉ सहभागी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या स्पर्धेच्या दर्जात अधिक भर पडेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com