सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळवण्यात आलेली 5 टी-२० सामन्यांची मालिका भारतीय संघाने 4-1 च्या फरकाने जिंकली. यानंतर आगामी चॅम्पिअन्स ट्रॉफीआधी सराव म्हणून भारतीय संघाला 3 वन-डे सामन्यांची मालिका इंग्लंडविरुद्ध खेळायची आहे. कर्णधार रोहित शर्मासह सर्व महत्त्वाचे भारतीय खेळाडू या मालिकेसाठी भारतीय संघात दाखल झाले आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत आपल्या खराब फॉर्ममुळे टीकेचा धनी बनलेल्या रोहित शर्माच्या संघातील स्थानाबद्दल बरीच चर्चा रंगली होती. इंग्लंडविरुद्ध मालिका सुरु होण्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत रोहितला त्याच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर रोहितने थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
हा काय प्रश्न आहे? रोहित जेव्हा पत्रकारावर चिडतो...
नागपूर येथे सामन्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत रोहित शर्माला त्याच्या सध्याच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारला असता रोहितने त्यावर आपली नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, "हा काय प्रश्न आहे? तो प्रकार वेगळा होता हा वेगळा प्रकार आहे, ही वेळ देखील वेगळी आहे. साहजिकच क्रिकेटपटू म्हणून आम्हाला हे माहिती असतं की आमच्या कारकिर्दीत चढ-उतार हे येत असतात. माझ्या कारकिर्दीत मी हे चढ-उतार अनेकदा अनुभवले आहेत, त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नाहीये. प्रत्येक दिवस आणि मालिका ही आमच्यासाठी नवीन असते आणि त्याच पद्धतीने आम्ही त्याची तयारी करतो".
माझ्यासाठी हे आव्हान - रोहित शर्मा
यापुढे बोलत असताना रोहित शर्मा म्हणाला, "काही महिन्यांपूर्वी काय झालं याचा विचार न करता या परिस्थितीकडे मी एक आव्हान म्हणून पाहतो आहे. तुम्हाला ते करता येत नाहीये, त्यामुळे माझ्यासाठी पाठीमागे काय घडलं याचा विचार करण्याचं काही कारणच नाहीये. अनेक चांगल्या गोष्टीदेखील घडल्या आहेत. त्यामुळे आता माझ्यासमोर जे आव्हान येणार आहे त्याचा विचार करणं माझ्यासाठी गरजेचं आहे. माझ्यासाठी हे इतकं सोपं आहे. मालिकेची सुरुवातच चांगल्या पद्धतीने करण्याचा माझा प्रयत्न असेल".
...आणि रोहितची नाराजी आणखी स्पष्टपणे समोर आली -
एरवी कोणत्याही परिस्थितीला शांतपणे समोर जाणाऱ्या रोहित शर्माचं एक वेगळं रुप यावेळी पहायला मिळालं. याच पत्रकार परिषदेत रोहितला त्याच्या भविष्यातील प्लानबद्दल विचारलं असता त्याची नाराजी स्पष्टपणे दिसून आली. "3 वन-डे सामन्यांची मालिका आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी समोर असताना आता इथे बसून मी माझ्या फ्युचर प्लानबद्दल बोलणं किती योग्य ठरेल? माझ्याबद्दल अनेक बातम्या गेल्या काही वर्षांपासून येत आहेत, पण त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी इथे आलो नाहीये. माझ्यासाठी ही वन-डे मालिका आणि चॅम्पिअन्स ट्रॉफी महत्त्वाची आहे. माझं संपूर्ण लक्ष या मालिकेवरच आहे, पुढे काय होईल हे नंतर पाहिलं जाईल".
हे ही वाचा - Champions Trophy 2025: एक तासापेक्षा कमी वेळ आणि Ind vs Pak सामन्याची तिकीटं संपली
यादरम्यान रोहितला हार्दिक पांड्याची इंज्युरी आणि त्याच्यासाठीच्या प्लान बी बद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावरही रोहितने काहीशा नाराजीतच आपलं उत्तर दिलं. "आपण नकारात्मक गोष्टींचाच का विचार करत आहोत? हा इंज्युअर्ड होईल, असं होईल...तसं होईल...साहजिकच या सर्व गोष्टी निवड समितीच्या डोक्यात आहेतच. त्या मी इथे बोलू शकणार नाही. हार्दिक पांड्या इंज्युअर्ड झाल्यानंतरही आम्ही वर्ल्डकप खेळलो. स्पर्धा आम्ही हरलो तरीही संपूर्ण स्पर्धेत आमची कामगिरी चांगली राहिली होती. त्यामुळे इंज्युअर्ड झाला तर काय याचा विचार मी करत नाहीये".