भुपेंद्र आंबवणे, प्रतिनिधी
Bhiwandi News : भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून मागील वर्षभरात 11 हजार 37 जणांना श्वानदंश झाल्याची आकडेवारी समोर येत असतानाच एका श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हमीद सद्दाम खान असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर...
भिवंडी शहरातील ईदगाह या परिसरात घराबाहेर खेळत असताना 10 जानेवारी रोजी भटक्या कुत्र्याने हमीद सद्दाम खान यावर हल्ला चढवत त्याच्या चेहऱ्यावर, मानेजवळ चावा घेतला होता. त्यावर स्व.इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय येथे वेळोवेळी दाखल करून उपचार करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा त्रास होऊ लागल्याने भिवंडी स्व.इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात 28 जानेवारी रोजी पालक हमीद खान याला घेऊन आले होते. तेथे उपचार करून श्वानदंशा संदर्भात पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातून कस्तुरबा रुग्णालयात पाठवलं. तेथे उपचारा दरम्यान 31 जानेवारी रोजी हमीद खान याची प्राणज्योत मावळली.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे पालिकेचे 12 वर्षांपासून बंद असलेले श्वान निर्बीजीकरण केंद्र मागील वर्षी सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर ही शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत समोर येत आहे. भटक्या कुत्र्याच्या दहशतीमुळे मी स्वतः भयभीत असून भिवंडी सारख्या शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात श्वानदंशावरील प्रतिबंधक अँटी रेबीज लस वेळेत न दिल्याने ही समस्या उद्भवल्याने एका चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागला असा आरोप केला जात आहे. ही गंभीर बाब असून या जबाबदार असणाऱ्यांवर आपण कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.
निर्बीजीकरण्याचं काम व्यवस्थित होत नाही. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढतेय. एखाद्या भागातून कुत्रे उचलले की ते पंधरा दिवस ते ठेवतात आणि दुसऱ्या भागात सोडले जातात. त्यामुळे त्या कुत्र्यांना मानसिक तणाव येतो आणि ते अधिक आक्रमक होतात. अन् चावण्याचा प्रयत्न करतात. निर्बीजीकरणाला वेळ लागत असेल तर लस देऊन लोकांचा जीव कसा वाचवता येईल याकडे लक्ष द्यायला हवं, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.
रुग्णालयाकडून स्पष्टीकरण..
हमीद सद्दाम खान हा 12 वर्षांचा होता. तो ईदगाह रोडजवळ राहत होता. हमीदच्या शरीरावर कुत्र्याच्या चाव्याची खोल जखम झाली होती. यानंतर त्याला सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला तपासलं अन् अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. मात्र कुटुंबाने त्याला अॅडमिट न करता घरी आणलं, अशी माहिती सांगितली जात आहे. यानंतर त्याला रेबिजचं इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर तो थेट २८ तारखेला आला. त्यावेळी हमीद घाबरलेल्या अवस्थेत होता. त्याला दम लागत होता. त्याची प्रकृती अधिक बिघडली होती. नातेवाईकांनी सांगितलं की, गेल्या ४-६ दिवसांपासून त्याला ताप येत होता आणि दम लागत होता. यानंतर तातडीने त्याच्यावर उपचार केल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world