ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Pune Crime News Update : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पुणे प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे.पुण्यात प्रतिबंधित वन्यजीव प्रजातींचा बेकायदेशीर ताबा बाळगणे आणि त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. डीआरआय पुणे युनिटकडून पुणे रेल्वे स्थानकाजवळ प्रतिबंधित वन्यजीव प्रजाती जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळं पुणे शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,डीआरआय अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली आणि 20 मे रोजी निश्चित केलेल्या ठिकाणी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता,दोन पुठ्ठ्यांच्या खोक्यांमध्ये लपवून ठेवलेल्या तीन जिवंत शेकरू आढळून आल्या आणि पथकाकडून त्या जप्त करण्यात आल्या.डीआरआय अधिकारी पुण्यातच एका दुसऱ्या ठिकाणी पोहोचले.जिथे दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून सात जिवंत 'इंडियन स्टार टॉर्टॉईज' जप्त करण्यात आल्या.
नक्की वाचा >> Pune News: बिष्णोई गँगच्या तिघांना उत्तराखंडमधून अटक, 'त्या' मॉलवर अंदाधुंद गोळीबार, 2 कोटींची खंडणी अन्..
'इंडियन स्टार टॉर्टॉईज'या प्रजातीचाही समावेश'
शेकरू या प्रजातीचा समावेश 'वन्यजीव (संरक्षण)अधिनियम,1972' च्या अनुसूची-1 (Schedule I) मध्ये करण्यात आला आहे.त्यामुळे या अधिनियमानुसार परवानगी असल्याशिवाय त्यांची शिकार करणे आणि त्यांचा व्यापार करणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे.'इंडियन स्टार टॉर्टॉईज'या प्रजातीचाही समावेश'वन्यजीव (संरक्षण) अधिनियम,1972' च्या अनुसूची-1 मध्ये करण्यात आला आहे. यामुळे या प्रजातींना सर्वोच्च दर्जाचे संरक्षण प्राप्त होते आणि त्यांची शिकार करणे,त्यांना ताब्यात बाळगणे,त्यांची वाहतूक करणे आणि त्यांचा व्यापार करणे यांवर पूर्णपणे बंदी आहे.
वन्यजीवांची अवैध शिकार करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कारवाई होणार
जप्त करण्यात आलेले वन्यजीव, तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या दोन व्यक्ती आणि वन्यजीवांना लपवण्यासाठी वापरलेले पॅकिंग साहित्य पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे येथील वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. ही कारवाई 'वन्यजीव (संरक्षण) अधिनियम,1972'अंतर्गत केली जाणार आहे. अनैतिक कृत्ये करणाऱ्या घटकांविरुद्ध आणि वन्यजीवांची अवैध शिकार करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध गुप्त माहितीवर आधारित मोहिमा राबवून, वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणीय शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी डीआरआय कटिबद्ध आहे.