
मनोज सातवी
मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सध्या वेगवेगळ्या कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे विशेषता नालासोपारा परिसर चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या आठवड्याभरात या ठिकाणी तीन मोठ्या कारवाया करण्यात आल्या. यामध्ये विशेषतः तुळिंज पोलिसांनी दोन नायजेरियन महिलांसह एका नायजेरियन पुरुषाला ड्रग्स तस्करी प्रकरणी अटक केले आहे. या तीन कारवायांमध्ये नऊ कोटी 45 लाख रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच, या आरोपींवर एनडीपीएस कायद्यासह पासपोर्ट कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परंतु नालासोपारा परिसराला ड्रग्स आणि अनधिकृत नायजेरियनचा बसलेला विळखा कधी सुटणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नालासोपारा मधील तुळींज पोलिस ठाण्या अंतर्गत विशेषतः प्रगती नगर भागातून 21 मे रोजी एका नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 1 किलो 112 ग्रॅम एम डी ड्रग्स जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सव्वा दोन कोटी रुपये आहे. या अगोदर अगोदर 18 मे रोजी एका नायजेरियन महिलेला 800 ग्राम ड्रग्ससह अटक करण्यात आली होती. याशिवाय दोन दिवस अगोदर एका घरात चालणारा मॅफेड्रिन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला होता. हा कारखाना चालवणाऱ्या एका घाना देशाच्या नागरिक असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली. तिचा साथीदार फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल 2 किलो 800 ग्राम MD ड्रग्स जप्त केले. त्याची किम्मत 5 कोटी 60 लाख 40 हजार 150 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आठवडाभरात पोलिसांनी जप्त केलेला अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारानुसार 9 कोटी 45 लाख 92 हजार इतकी आहे. या सर्व अमली पदार्थांचा सोर्स कुठून आलेला आहे, हा कुठपर्यंत जाणार होता याचा देखील तपास केला जात आहे. या गुन्ह्यांमध्ये आढळणारे किंवा अवैधरित्या राहणारे नायजेरियन लोक आहेत. त्यांना घर भाड्याने देणाऱ्या 65 घरमालकांवर केसेस करण्यात आलेल्या आहेत. तसेच ड्रग्स आहारी गेलेल्या 127 जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नालासोपारा परिसरात आढळणारे ड्रग्स आणि इतर अमली पदार्थ हा एक चिंतेचा विषय बनला आहे. पोलिसांकडून याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने कारवाया सुरू आहेत. परंतु आपल्या आसपास अशा पद्धतीचे काही अवैधरित्या राहणारे किंवा अवैध धंदे करणारे नायजेरियन लोक आढळले तर जवळच्या पोलीस स्टेशनला याची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यामुळे नालासोपारा आणि इतर परिसराला बसलेला ड्रग्स आणि इतर अमली पदार्थाचा विळखा कधी सुटतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world