
Maharashtra Government Services on WhatsApp via Aaple Sarkar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आपले सरकार' पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना सरकारी सेवा अधिक सुलभतेने मिळाव्यात यासाठी सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्य बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
सेवा व्हॉट्सॲपवर: 'आपले सरकार' पोर्टलवरील 1001 सेवा व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या स्मार्टफोनवरच आवश्यक ती माहिती आणि सेवा मिळणार आहे.
तालुकास्तरीय 'रिंग' प्रणाली: प्रत्येक तालुक्यात 10 ते 12 गावांचा समावेश असलेली 'रिंग' तयार करावी. यामुळे गरजेनुसार सेवा पुरवणे अधिक सोपे होईल. या रिंगच्या व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र गट आणि टीम तयार केली जाईल.
सेवांचे सुलभीकरण: मुंबई महानगरपालिकेच्या एकाच प्रकारच्या 9 सेवा एकत्र करण्याचे निर्देश दिले आहेत.
कागदपत्रे कमी करा: अर्ज करताना लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गुणवत्ता तपासणी: सेवांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी त्रयस्थ संस्थेद्वारे नियमित तपासणी केली जाईल.
एकरूप डॅशबोर्ड: सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसारखे असावेत, जेणेकरून नागरिकांना राज्यभर एकसारखा अनुभव मिळेल.
अपील आणि मल्टी-मॉडेल प्रणाली: मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सेवा वितरणात अपीलची सुविधा आणि प्रमाणपत्र वितरणासाठी ईमेल, पोर्टल, व्हॉट्सॲप अशा मल्टी-मॉडेल प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
( नक्की वाचा : Thane Metro : ठाणे मेट्रोची प्रतीक्षा संपली! 'या' 10 स्टेशनवरून धावणार मेट्रो, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन कोणतं? )
या बैठकीला राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 'आपले सरकार' पोर्टलवर सध्या 1001 सेवा उपलब्ध असून, गेल्या पंधरा दिवसांत यात 236 नव्या सेवांची भर पडली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world