जाहिरात

Akola News : अकोल्यात सावकार मोकाट; पैसे परत देऊनही जमीन बळकावली, तरुणांनं उचललं टोकाचं पाऊल

Akola News : अकोल्यातील पातूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पातूरमध्ये  सावकारीच्या जाळ्यात अडकल्यामुळे एका व्यक्तीने स्वत:चे आयुष्य संपवले.

Akola News : अकोल्यात सावकार मोकाट; पैसे परत देऊनही जमीन बळकावली, तरुणांनं उचललं टोकाचं पाऊल
प्रतिकात्मक फोटो
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News : अकोल्यातील पातूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पातूरमध्ये  सावकारीच्या जाळ्यात अडकल्यामुळे एका व्यक्तीने स्वत:चे आयुष्य संपवले. मृत व्यक्तीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, पातूर पोलिसांनी दोन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओमध्ये काय?

गोपाळ पाटखेडे (Gopal Patkhede) असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी 26 नोव्हेंबर 2025 रोजी आत्महत्या केली होती. मृतकाचे भाऊ नागेश पाटखेडे यांनी 28 नोव्हेंबर 2025 रोजी पातूर पोलिसांत तक्रार दाखल केली. नागेश पाटखेडे यांनी तपासणीदरम्यान गोपाल पाटखेडे यांचा मोबाईल चाळला असता, त्यांना मृत्यूपूर्वीचे एक व्हिडिओ रेकॉर्डिंग सापडले.

या रेकॉर्डिंगमध्ये गोपाळ यांनी, सावकार राकेश भूपेंद्र गांधी (Rakesh Bhupendra Gandhi) आणि सचिन उर्फ बंटी खरळ (Sachin alias Bunty Kharal) यांच्याकडून मिळालेल्या जीवघेण्या धमक्यांचा उल्लेख केला असल्याचे फिर्यादीत स्पष्ट केले आहे.

( नक्की वाचा : Akola News: 2 दिवसांत CEO दाखल! आमदार मिटकरींचा दौरा अकोल्याच्या डॉक्टरांसाठी ठरला कर्दनकाळ; कुणावर कारवाई ? )

काय केले आरोप?

तक्रारीनुसार, मृत गोपाळ पाटखेडे यांनी आरोपी राकेश गांधी यांच्याकडून 20 टक्के व्याजदराने पैसे घेतले होते. गोपाळ यांनी घेतलेली संपूर्ण रक्कम परत केली असतानाही, आरोपींनी त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. धमक्या देऊन त्यांनी मौजा बेलोरा खुर्द येथील सर्व्हे नंबर 72 (Survey No. 72) मधील 40 आर (40 R) शेती जबरदस्तीने खरेदी नोंदवून घेतली.

जमीन बळकावण्याच्या या व्यवहारात दिलीप आप्पाराव देशमुख (Dilip Apparao Deshmukh) आणि संतोष बळीराम सावंत (Santosh Baliram Sawant) यांचे सहकार्य असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. दस्त क्रमांक 5159/2025 (Document No. 5159/2025) नुसार ही जमीन सावकारी मार्गाने हस्तांतरित झाल्याचा उल्लेख मृतकाने रेकॉर्डिंगमध्ये केला आहे. विशेष म्हणजे, घेतलेले सर्व पैसे परत केल्यानंतरही, आरोपींकडून गोपाळ यांच्यावर आणखी 8 लाख रुपये बाकी असल्याचा खोटा दबाव आणला जात होता. या खोट्या दबावामध्ये आरोपी सातत्याने गोपाल यांचा छळ करत होते.

( नक्की वाचा : Akola News : 'पाकिस्तान जिंदाबाद' Video चा पर्दाफाश; चिमुरड्यांच्या घोषणांचं अकोला पोलिसांनी सांगितलं सत्य )

दोन आरोपींविरुद्ध आत्महत्येचा गुन्हा दाखल

नागेश पाटखेडे यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे की, सावकारांकडून होत असलेल्या सततच्या छळाला, धमक्यांना आणि बळजबरीने जमीन हिरावून घेतल्यामुळे आलेल्या मानसिक दडपणाला कंटाळूनच त्यांच्या भावाने टोकाचे पाऊल उचलले. 

या तक्रारीच्या आधारावर, पातूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत राकेश गांधी आणि बंटी खरळ यांच्या विरोधात कलम 108, 352 (BNS) आणि 3(5) (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

पातूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या गंभीर घटनेमुळे पातूर शहरात सावकारीच्या त्रासावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com