योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News: अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील रिधोरा शिवारात एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेत शिवारात अचानक तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने काही नागरिकांनी परिसरात पाहणी केली असता, त्यांना एका तरुणाचा मृतदेह पडलेला दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
काय आहे प्रकरण?
रिधोरा ते कलकत्ता धाबा परिसरातील शेतात मिळालेल्या या मृतदेहाची अवस्था अत्यंत विद्रूप झालेली होती. प्राथमिक पाहणीत हा मृत्यू साधारण 72 तास आधी झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह उघड्यावर असल्याने काही वन्य प्राण्यांनी त्याचा काही भाग कुरतडल्याचेही समोर आले आहे. मृतदेहाचा चेहरा जाळल्याची चर्चा परिसरात सुरू असल्याने या घटनेने संशयाचे काहूर माजले आहे. प्राथमिक स्तरावर ही घटना केवळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
( नक्की वाचा : Baramati Husband: 4 वर्षांच्या संसाराचा रक्तरंजित शेवट! बारामतीच्या नवऱ्यानं बायकोला कारखाली चिरडले, कारण काय? )
मृताची ओळख आणि कौटुंबिक पार्श्वभूमी
पोलिसांनी केलेल्या तपासात मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आले आहे. सचिन वाल्मीक खंडारे, वय 30 वर्षे, असे या मृत तरुणाचे नाव आहे. सचिन हा अकोल्यातील अमानतपूर परिसरातील रहिवासी होता. तो गेल्या काही दिवसांपासून आपल्या मामाच्या गावी राहण्यासाठी आला होता. दोन दिवसांपूर्वी तो कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडला होता, मात्र तो घरी परतलाच नाही. कुटुंबिय त्याचा शोध घेत असतानाच गुरुवारी दुपारी त्याचा मृतदेह आढळून आला.

सचिन खंडारेचा मृत्यू नेमका कसा झाला, हे अजून स्पष्ट झालेलं नाहीय तो त्या निर्जन भागात कशासाठी गेला होता आणि तिथे त्याच्यासोबत नेमके काय घडले, याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याच्या अंगावरील काही भाग जळालेल्या स्थितीत असल्याचे सांगण्यात येत असल्याने, ही हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
( नक्की वाचा : Akola News: अकोला महापालिकेत मोठी उलथापालथ! 4 नगरसेवक फुटले, गटनेता बदलला; ठाकरेंच्या पक्षाला सुरुंग )
शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष
बाळापूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. आज शवविच्छेदन झाल्यानंतर सचिनवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, अशी माहिती बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी दिली आहे. ठाणेदार झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक विविध अंगांनी तपास करत असून, या घटनेमुळे अमानतपूर परिसरात शोककळा पसरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world