अमरावतीच्या नेरपिंगळाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह गुरुवारी (30 मे) सकाळी 8 च्या सुमारास त्यांच्याच क्वार्टरमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा तिरपुडे (45) यांचा कॉल लागत नसल्याची तक्रार चंद्रपूरातून त्यांच्या मित्राने अमरावतीतील खासगी डॉक्टरांना केली होतं. यानंतर धक्कादायक घटना उघडकीस आली. दोन दिवसांपूर्वी महिलेचा मृत्यू झाल्यामुळे मृतदेहाला दुर्गंधी सुटली होती.
नक्की वाचा - Pimpri-Chinchwad: सांगवीमध्ये सराईत गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या
पोलीस सूत्रांनुसार, डॉ. सुषमा तिरपुडे (45) असं मृत वैद्यकीय अधिकाऱ्याचं नाव आहे. त्या एकट्याच आपल्या क्वार्टरमध्ये राहत होत्या. मागील दोन दिवसांपासून त्या फोन उचलत नव्हत्या. म्हणून चंद्रपुरातील पोहरकर नावाच्या त्यांच्या मित्राने नेरपिंगळाई गावातील खासगी डॉक्टरांचा मोबाइल क्रमांक इंटरनेटवरून शोधला. त्यांना डॉ. तिरपुडे या दोन दिवसांपासून फोन उचलत नसल्याचे सांगितले. या फोननंतर त्यांनी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन चौकशी केली असता, तेथील कर्मचाऱ्यांनी डॉक्टर क्वार्टरमध्ये झोपल्याचं सांगितलं. यानंतर त्यांच्या खोलीचं दार ठोठावलं, मात्र आतून कुठलाच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर या क्वार्टरची खिडकी उघडून पाहिली असता त्या बेडवर पडून असल्याचं त्यांना दिसलं. ही हत्या की आत्महत्या याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. त्यामुळे शिरखेड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
नक्की वाचा - पोर्शे कार अपघात: रक्ताचे नमुने बदलण्यासाठी 50 लाखाचा व्यवहार, माजी पोलिस अधिकाऱ्याचाही फोन
नेर पिंगळाई आरोग्य केंद्राचा परिसर मोठा असून येथे दिवसभर वैद्यकीय सेवा पुरविण्यात येते. अशावेळी कार्यरत महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दोन दिवसांपासून संपर्क होत नसल्याचं तेथील कर्मचाऱ्यांना माहिती नव्हते. दोन दिवस उलटले तरीही हाकेच्या अंतरावर असलेल्या क्चार्टरकडे कोणीही कसं फिरकलं नाही, यावरुन आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विवाहित असलेल्या डॉ. सुषमा तिरपुडे या विभक्त असून त्या आपल्या क्वार्टरवर एकट्याच राहत असल्याची माहिती शिरखेड पोलिसांनी दिली आहे.