'ती अजूनही धक्क्यात, लघवीला जायला घाबरते, शाळेतही जाण्यास नकार'

ती चिमुरडी अजूनही त्या धक्क्यातून बाहेर आलेली नाही.

Advertisement
Read Time: 2 mins
बदलापूर:

बदलापुरातील (Badlapur Child Abuse) एका शाळेत जिथं 'आदर्श' नागरिक घडविण्यासाठी शिकवण दिली जाते, तिथेच दोन चिमुरडींचं लैंगिक शोषण करण्यात आलं. या घटनेनं केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला धक्का बसला आहे. ही घटना 13 तारखेला घडली होती, मात्र याचा उलगडा तीन दिवसांनी झाला. मुलीच्या कुटुंबीयांनाही याची माहिती नव्हती. मात्र मुलीच्या वागणुकीत बदल झाल्याने त्यांना संशय आला आणि त्यांनी तिच्या वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला आणि धक्कादायक बाब उघड झाली. 

त्या घटनेनंतर चिमुरडी धक्क्यात असल्याचं तिच्या कुटुंबीयांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना सांगितलं. या घटनेनंतर ती लघवी रोखून ठेवत होती. तिला लघवीला जायला भीती वाटत होती. तिला नीट चालताही येत नव्हतं. तोपर्यंत तरी पीडितेला संसर्ग झाल्याचं तिच्या कुटुंबीयांना वाटत होतं. मात्र वैद्यकीय तपासात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 

नक्की वाचा - महिला पत्रकाराशी अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या बदलापुरातील माजी नगराध्यक्षांवर काय कारवाई होणार?

शाळा व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष...
पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात शाळा व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी शाळेतील काहीजणींनी आरोपीविरोधात शाळेच्या शिक्षकांकडे तक्रार केली होती. मात्र शाळेकडून यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. वेळीच याची दखल घेतली असती तर हा अनर्थ टाळता आला असता असं पीडितेच्या पालकांचं म्हणणं आहे. याशिवाय आरोपीविरोधात एफआयआर नोंदवण्यात बारा तास उशीर करण्यात आला. यानंतरही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेले असता दिरंगाई केल्याचा पीडितेच्या पालकांचा आरोप आहे.