झटपट पैसे कमवण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. त्यासाठी काही जण शॉर्टकटचा अवलंब करतात. असा एक प्रकार बदलापूर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. बदलापूर पूर्व पोलिसांनी एका अट्टल चेन स्नॅचरला अटक केली आहे. त्याच्याकडून बदलापूरमधील चेन स्नॅचिंगच्या 5 गुन्ह्यांची उकल झाली आहे. विशेष म्हणजे या चोरट्याने चोरी करण्यासाठी युट्यूबची मदत घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे पोलिसही आवाक झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसात चेन स्नॅचिंगचे सलग 5 गुन्हे घडले होते. त्यामुळे पोलिसांकडून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अशातच बदलापूर शहरात संशयास्पद पणे फिरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याने आपणच चेन स्नॅचिंगचे 5 गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली. या चोरट्याचं नाव प्रवीण प्रभाकर पाटील असं आहे. तो कर्जत जवळच्या शेलू इथं राहणारा आहे.
प्रवीण याच्यावर आधी कर्जत तालुक्यात हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. त्यानंतर झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने युट्यूबवर चेन स्नॅचिंग कशी करावी? याचा व्हिडिओ त्याने पाहिला. त्यानंतर बदलापूर शहरात एकटाच येऊन तो चेन स्नॅचिंग करू लागला. मात्र अखेर बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि गुन्हे पोलीस निरीक्षक राजेश गजल यांच्या मार्गदर्शना खालील टीमने प्रवीण पाटील याला बेड्या ठोकल्या.
ट्रेंडिंग बातमी - 'बीडमध्ये भीषण दडपशाही', अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टीच भाजप आमदाराने सांगितल्या
शिवाय त्याच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल केली. पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण, प्रशांत थिटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम कुकले, हवालदार विजय गिरीगोसावी, जगदीश म्हसकर, सुधाकर वरखंडे, कृष्णा पाटोळे, कुणाल शिर्के, पोलीस नाईक विनोद नेमाणे, शिपाई महादेव पिसे यांचा या टीममध्ये समावेश होता. पोलिसांनी या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेलं साडेचार तोळे सोनं देखील हस्तगत केल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे हे देखील उपस्थित होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world