मस्साजोगचे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांचा किती क्रूरतेने खून झाला याचा पाढाच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाचला. त्यांनी संपुर्ण घटनाक्रम सांगितला. संतोष यांच्याबरोबर काय काय झाले हे सांगत असताना अंगावर काटा येत होता. सभागृह स्तब्ध झालं होतं. राज्याच्या इतिहास एवढा क्रूर खून कधीच झाला नव्हता असं आव्हाड यांनी सांगितलं. या खूनामागचा आका कोण आहे, याचे संकेत आव्हाड यांनी दिले. तो तुमच्या मंत्रिमंडळात असल्याचे सांगत आव्हाड यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्हाला संतोष देशमुखांच्या मुलांची शपथ, त्या माणसाला मंत्रिमंडळातून काढा असे आवाहन त्यांनी केले. संतोष देशमुखांच्या मुलांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. जी त्याची पत्नी आपली बहिण विधवा झालीय तिला न्याय द्यावाच लागेल असं ही आव्हाड यावेळी म्हणाले. त्यावेळी संपुर्ण सभागृह स्तब्ध झालं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष देशमुख याची हत्या कशी झाली याचा पाढा जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत मांडला. त्यांनी अगदी सुरूवातीपासून या हत्येचा घटनाक्रम सांगितला. खंडणी आणि त्यातून झालेला वाद, वाद सोडवण्यासाठी गेलेले सरपंच संतोष देशमुख. पण वाद सोडवण्यासाठी गेलेल्या संतोष यांना येवढी मोठी किंमत मोजावी लागेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. सुदर्शन घुले याने त्यावेळी संतोष देशमुख यांना मारहाण केली. सरपंचाला मारहाण होते म्हटल्यावर देशमुख यांनीही घुले याला फटकवले. हे प्रकरण पोलिस आल्यानंतर शांत झाले. पण धुले आणि वाल्मिक कराड यांचा यामुळे इगो हर्ट झाला होता असं आव्हाड म्हणाले. त्या क्षणापासून त्यांनी संतोष देशमुखच्या अपहरण आणि हत्येचा कट रचला.
ट्रेंडिंग बातमी - 'बीडमध्ये भीषण दडपशाही', अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टीच भाजप आमदाराने सांगितल्या
या खूनामध्ये पोलिसांचाही सहभाग होता. संतोषला प्लॅन करून बाहेर काढण्यात आलं. त्याला एका टोल नाक्यावर गाठण्यात आले. त्याच्या गाडीवर दगड टाकण्यात आला. त्यानंतर घुलेने त्याच्यावर दांडक्याने आणि तलवारीने हल्ला केला. त्याला दुसऱ्या गाडीत घालण्यात आले. एका ठिकाणी नेवून त्याला पालथी पाडण्यात आले. त्याच्यावर चार पाच जण ढोपराने नाचत होते. त्याला मारत होते. त्या मारहाणीत त्याच्या बरगड्या तुटल्या. त्या त्याच्या छातीत घुसल्या. त्याला सलग चार तास मारहाण केली जात होती. त्याला इतक मारलं की त्याच्या शरीरातलं चार लिटर रक्त आटलं. अशी माहिती आव्हाड यांनी यावेळी विधानसभेत दिली.
त्या पैकी एक जण त्याचा लाईव्ह व्हिडीओ काढत होता. तो व्हिडीओ या सर्वांचा आका पाहात होता. इतका क्रूर पणा कधीच महाराष्ट्राने पाहिला नाही. यात वाल्मिक कराडचा हात होता. त्याला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे. कोणाच्या पाठिंब्याने त्याने हे कृत्य केलं. वाल्मिक कराड हे पॅदं आहे. खरा वजिर वेगळाच आहेत. बीड जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात एकामागून एक हत्या झाल्या आहेत. त्या मागे कोणाचा हात आहे. या हत्यांची यादीच आव्हाड यांनी विधानसभेत झळकावली. संतोषला चार तास मारल्यानंतर एका शेतात फेकून देण्यात आलं. त्यानंतर त्याच्या कुटंबाला त्याची माहिती देण्यात आली. ज्यावेळी संपूर्ण गाव तिथे पोहचलं त्यावेळी संतोष मृत पावला होता. त्याचं शरीर काळंनिळ पडलं होतं.
ट्रेंडिंग बातमी - 'हिंमत असेल तर राजीनामा देऊन दाखवा' भुजबळांना भिडणारा नेता कोण?
तुम्ही याची चौकशी एसआयटी मार्फत कराल. पण एसआयटीमधल्या कोणत्याही अधिकाऱ्याची काय हिंमत आहे जे त्यांच्या विरोधात चौकशी करतील. सरकारच्या हाताखाली काम करणारे अधिकारी हे निष्पक्ष चौकशी कधीच करू शकणार नाहीत. त्यासाठी न्यायाधिशा मार्फत याची चौकशी झाली पाहीजे. मग बघा दुध का दुध आणि पानी का पानी होईल. वाल्मिक कराडचं नाव कुणीच घेतलं नाही. तो काय दाऊद किंवा छोटा शकील आहे का असा प्रश्नही त्यांनी केला. शिवाय वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस आहे हे मुख्यमंत्री तुम्हाला माहित नाही का? असा प्रश्नही त्यांनी केला. या खूननंतर मंत्रिमंडळात काही बदल होती अशी अपेक्षा होती. पण तसं झालं नाही.
आपल्या मंत्र्याची एक मुलाखत पाहीली. ते म्हणतात मर्डर फक्त बीडमध्ये होतो काय? बलात्कार बीडमध्येच होतो काय? संपुर्ण महाराष्ट्रात हेच चालू आहे. तो तुमचा सहकारी. तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो. तुमच्या सरकारचे धिंदवडे काढतो. या घटनेनंतर एकही पोलिस सस्पेंड झाला नाही. या घटनेतला प्रमुख आका कोण तुम्हाला माहित आहे. त्यामुळे कसली चौकशी करता. संतोष देशमुखच्या दोन्ही मुलांची तुम्हाला शपथ. त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा. मग बघा चौकशी कशी होते. असे आवाहन यावेळी फडणवीसांना आव्हाड यांनी केले. राजकीय हत्यांना तुमच्या काळात थारा नाही हे दाखलून द्या असंही आव्हाड यावेळी म्हणाले. तुम्हाला आपल्या बहिणीच्या डोळ्यातले आश्रू पुसावे लागतील. संतोषच्या विधवेला रस्त्यावर सोडता येणार नाही. आधार हरवलेल्या पोरांना उघड्यावर सोडता येणार नाही. एक बाप म्हणून तुम्ही तुमच्या मनाला विचारा आणि निर्णय घ्या असं शेवटी आव्हाड म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world