जाहिरात

Crime News : 36 वर्षांपूर्वी खून करून 'प्रदीप' झाला 'अब्दुल'; वाचा कशी केली पोलिसांनी अटक

Crime News: अटक टाळण्यासाठी त्याने स्वत:चा धर्म आणि नाव बदलले. पोलिसांच्या नजरेतून तो अनेक वर्षे गायब होता, पण अखेर 36 वर्षांनी कायद्याचा फास त्याच्याभोवती आवळला गेला

Crime News : 36 वर्षांपूर्वी खून करून 'प्रदीप' झाला 'अब्दुल'; वाचा कशी केली पोलिसांनी अटक
Crime News :  1989 मध्ये बेपत्ता झाल्यानंतर आरोपीनं धर्म बदलला होता.
मुंबई:

Crime News :  एका व्यक्तीवर 36 वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा आरोप होता. अटक टाळण्यासाठी त्याने स्वत:चा धर्म आणि नाव बदलले. पोलिसांच्या नजरेतून तो अनेक वर्षे गायब होता, पण अखेर कायद्याचा फास त्याच्याभोवती आवळला गेला आणि 36 वर्षांनंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

ही घटना एका बॉलिवूडपट किंवा थरारपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. उत्तर प्रदेशच्या बरेली शहरातून ही अविश्वसनीय बातमी समोर येत आहे.

धर्म बदलून बनला 'अब्दुल'

बरेलीमधील प्रेम नगर परिसरात 1989 मध्ये झालेल्या एका हत्येच्या प्रकरणात प्रदीप सक्सेना हा आरोपी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप सक्सेनाला 1989 मध्ये जामीन मिळाला होता, परंतु त्यानंतर तो कधीही कोर्टात हजर झाला नाही आणि फरार झाला. पोलिसांनी त्याचा खूप शोध घेतला, पण तो सापडला नाही.

पोलिसांच्या तपासामध्ये आता असं उघड झालं आहे की, 1989 मध्ये बेपत्ता झाल्यानंतर आरोपी प्रदीपने सर्वात आधी आपले मूळ नाव सोडून 'अब्दुल' हे नवीन नाव धारण केले. इतकंच नव्हे, तर त्याने स्वत:चा धर्मही बदलला. यानंतर तो मुरादाबाद येथे गेला आणि तिथे ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. आपल्या या नवीन ओळखीच्या बळावर तो इतकी वर्षे पोलिसांना सतत गुंगारा देत राहिला. मात्र, अखेर 36 वर्षांनंतर कायद्याचा फास त्याच्याभोवती आवळला गेला.

( नक्की वाचा : Shocking News: पती-पत्नी आणि तो! प्रेमाच्या आड येणाऱ्या नवऱ्याचा 'असा' झाला शेवट, वाचून उडेल थरकाप )
 

हायकोर्टाच्या आदेशाने तपास पुन्हा सुरू

हायकोर्टाच्या एका आदेशामुळे या जुन्या प्रकरणाला पुन्हा गती मिळाली.. कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले की, पुढील 4 आठवड्यांमध्ये आरोपीला अटक करून त्याला सीजेएम (CJM) बरेली यांच्यासमोर हजर करा, असा आदेश हायकोर्टानं  16 ऑक्टोबर 2025 दिला होता.

कोर्टाकडून आदेश मिळताच, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या अनेक टीम्स तातडीने कामाला लागल्या. त्यांनी या हत्या प्रकरणातील जुने रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली. तपास पथकाने आरोपीच्या मूळ गावी, शाही (Shahi) कस्ब्यात चौकशी केली. तेथील लोकांनी सांगितले की प्रदीप जवळपास 30 ते 35 वर्षांपूर्वीच गाव सोडून गेला आहे.

या चौकशीदरम्यान, पोलिसांना आरोपी प्रदीपच्या भावाचा, सुरेश बाबू याचा पत्ता मिळाला, जो साहूकारा (Sahukara) भागात राहतो. सुरेश बाबू यांच्या चौकशीतून पोलिसांना सर्वात महत्त्वाचा सुगावा मिळाला. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, प्रदीपने मुस्लीम धर्म स्वीकारला असून तो मुरादाबादमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतो.

हा सुगावा मिळताच पोलिसांनी मुरादाबाद गाठले. तिथे पोलिसांना माहिती मिळाली की, 'अब्दुल' उर्फ प्रदीप सक्सेना एका कामासाठी सध्या बरेलीमध्ये आला आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने सापळा रचून या आरोपीला अटक केली. 36 वर्षांपूर्वीच्या हत्येच्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com