जाहिरात

Jalgaon News: मारहाण, अपमान...गुलाबराव देवकर फार्मसी कॉलेजमध्ये भयंकर घडलं, विद्यार्थ्यानं उचललं टोकाचे पाऊल

Jalgaon News: जळगावमध्ये मन हादरवणारी घटना घडलीय. सर्वांसमोर मारहाण झाल्याचा अपमान सहन न झाल्यानं विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडलीय.

Jalgaon News: मारहाण, अपमान...गुलाबराव देवकर फार्मसी कॉलेजमध्ये भयंकर घडलं, विद्यार्थ्यानं उचललं टोकाचे पाऊल
"Jalgaon News: गुलाबराव देवकर फार्मसी कॉलेजमधल्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या"
NDTV Marathi

- मंगेश जोशी, प्रतिनिधी

Jalgaon News: जळगाव शहरातील मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. गुलाबराव देवकर फार्मसी कॉलेजमधील 20 वर्षीय विद्यार्थी शाम प्रभाकर पाटील याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सर्वांसमोर पीव्हीसी पाइपने मारहाण केल्याचा अपमान सहन न झाल्याने शामने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात प्राचार्य योगेश पवार यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाबराव देवकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आहेत.

कॉलेजमध्ये नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरू होता. शाम पाटीलने केवळ त्यांच्यातील वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी केली. मग त्याच दोन मुलांनी शाम पाटीलला किरकोळ स्वरुपात मारहाण केली. हे प्रकरण कॉलेजच्या प्राचार्यांपर्यंत पोहोचले. प्राचार्य योगेश पवार यांनी संबंधित तीनही विद्यार्थ्यांना आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले आणि सर्वांसमोर प्राचार्यांनी त्यांना मारहाण केली. सर्वांसमोर झालेला हाच अपमान शामच्या जिव्हारी लागला आणि त्याने आत्महत्या केली.

(नक्की वाचा: Pune News: खेड हादरले! जलजीवन मिशनच्या 50 फूट खोल विहिरीत बुडाला 10 वर्षांचा मुलगा; 24 तासांनतर थेट मृतदेह सापडला)

सुसाइड नोट आणि ऑडिओ क्लिपमध्ये धक्कादायक खुलासे

आत्महत्या करण्यापूर्वी शामने एक सुसाइड नोट लिहिली आहे, ज्यामध्ये त्याने प्राचार्यांच्या वागणुकीचा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे तर आत्महत्येपूर्वी त्याचे नातेवाईकांशी झालेले मोबाइलवरील संभाषणही समोर आले आहे. या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये तो अत्यंत व्यथित दिसत होता. मारहाणीमुळे तो मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती समोर आलीय.

पोलिसांची भूमिका

रामानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम हा पेइंग गेस्ट म्हणून राहत होता, तिथेच त्याने आत्महत्या केली. "दोन मुलांचे भांडण सोडवायला गेलेल्या शामला प्राचार्यांनी बोलावून सर्वांसमोर मारहाण केली होती. या अपमानस्पद वागणुकीमुळे तो मानसिकरित्या अस्वस्थ झाला होता. सुसाइड नोट आणि प्राथमिक पुराव्यांच्या आधारे प्राचार्य योगेश पवार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहेत," असे गुंजाळ यांनी सांगितले.

(नक्की वाचा: Beed Crime: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीड हत्याकांडात मोठी अपडेट! दोघांची 'नार्को', एकाची 'ब्रेन मॅपिंग टेस्ट)

या घटनेमुळे जळगावच्या शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि शिक्षकांच्या वागणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com