राहुल कांबळे, नवी मुंबई
नवी मुंबई शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भीक मागण्याच्या नावाखाली नागरिकांना ब्लॅकमेल करून पैशांची उकळपट्टी करणारे रॅकेट सक्रिय असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेषतः नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर परिसरात हा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टोळीची लूटमारीची पद्धत
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी काही महिला व लहान मुली भीक मागण्याच्या बहाण्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधतात. त्यानंतर संगनमताने संबंधित व्यक्तींवर गैरवर्तनाचे किंवा छेडछाडीचे खोटे आरोप लावण्याची धमकी दिली जाते. “पोलिसांत तक्रार करू” असा दम देत मोठ्या रकमेची मागणी केली जाते. अनेकजण बदनामीच्या भीतीने पैसे देण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप आहे.
(नक्की वाचा- Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)
उद्योजकाची धाडसी तक्रार
या संदर्भात खारघर येथील उद्योजक श्रीकृष्ण गोसावी यांनी थेट नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत अशा प्रकारच्या टोळ्या संघटित पद्धतीने कार्यरत असून सामान्य नागरिकांना जाळ्यात ओढत असल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
दरम्यान, शहरातील काही राजकीय नेते आरोप-प्रत्यारोपांमध्ये व्यस्त असताना सामान्य नागरिक मात्र असुरक्षिततेच्या छायेत जीवन जगत असल्याची भावना व्यक्त होत आहे. शहराची प्रतिमा मलिन करणाऱ्या या प्रकारावर वेळीच अंकुश न ठेवल्यास परिस्थिती गंभीर होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अशा प्रकारांपासून सावध राहावे, अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना खबरदारी घ्यावी आणि कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Crime News: मैत्रिणीची हत्या अन् मृतदेहावर अत्याचार; 'आत्मा' बोलावण्यासाठी अघोरी कृत्य, भयंकर घटनाक्रम)
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, संबंधित टोळीचा लवकरच पर्दाफाश होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि अशा प्रकारांना आळा घालावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world