
मर्डर, खंडणी, अपहरण या आणि या सारख्या अनेक गुन्ह्यांमुळे बीड जिल्हा काही काळापासून बदनाम होत आहे. या सर्व घटनांनी जिल्हा जणू हादरून गेला आहे. बीडची तुलना बिहार बरोबर ही झाली. गँग ऑफ वासेपूर प्रमाणे गँग ऑफ बीडचा उल्लेख केला जावू लागला. संतोष देशमुख हत्येने तर संपूर्ण राज्यचं हादरलं. पण बीड जिल्ह्यातील गुन्हे काही कमी झाले नाहीत. त्यात आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे संताप तर व्यक्त केला जात आहेच, पण जे काही घडलं त्या प्रवृत्तीमुळे बीडचे नाव ही खराब झाल्याची चर्चा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना बीड जिल्ह्यातील दिंद्रुडमध्ये घडली आहे. ऊसतोडणीसाठी एका महिलेने उचल घेतली होती. पण उचल घेतलेल्या रकमेतील काही रक्कम तिच्याकडे शिल्लक राहीली होती. तिला ती परत करता येत नव्हती. याचाच गैरफायदा मुकादमाने घेतला. त्याने त्या महिलेवर अत्याचार केले. अत्याचार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो त्याने काढले होते. ही महिला गावातच राहात होती. शिवाय ती विवाहीत होती.
अत्याचार करून आणि तिचे अश्लील फोटो काढून तो नराधम मुकादम थांबला नाही. त्याने त्या विवाहीत महिलेचे अश्लील फोटो गावातल्या वॉट्सअप ग्रुपवरच टाकले. ते फोटो संपूर्ण गावात वाऱ्या सारखे व्हायरल झाले. घराघरात असलेल्या मोबाईलमध्ये हे फोटो पाहीले गेले. याची कुणकुण संबंधीत महिलेला लागली. ते फोटो पाहून तिलाही धक्का बसला. त्याच वेळी तिने स्वत: ला संपवून घेण्याचा निर्णय घेतला. तिने विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्या महिलेला वाचवण्यात यश आलं आहे.
चौकशीमध्ये महिलेने झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. शिवाय मुकादमा विरोधात तक्रार ही दाखल केली आहे. तिच्या तक्रारीवरून मुकादम अमोल शिनगारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला याबाबतची माहिती मिळताच तो फरार झाला आहे. पोलिस त्याला शोधण्यासाठी गेले होते. पण तो हाती लागला नाही. आता पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. ते त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनं संपूर्ण गाव हादरून गेला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world