जाहिरात

Beed: SRPF चा जवान ते चंद्रपूरचा तलाठी! बीडच्या तरुणाने कष्टानं घडवलेलं आयुष्य लग्नानंतर 12 दिवसांत संपवलं

Beed News : लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत एका तरुण तलाठ्यानं गळफास लावून स्वत:चं आयुष्य संपवलं आहे.

Beed: SRPF चा जवान ते चंद्रपूरचा तलाठी! बीडच्या तरुणाने कष्टानं घडवलेलं आयुष्य लग्नानंतर 12 दिवसांत संपवलं
Beed News: गणेशनं ती डायरी स्वत: वाचली आणि... (प्रतिकात्मक फोटो)
बीड:

आकाश सावंत, प्रतिनिधी

Beed News:  बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे.  लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत एका तरुण तलाठ्यानं गळफास लावून स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. संसाराची नवी स्वप्नं पाहणाऱ्या या तरुणाच्या आत्महत्येनं संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला असून या मृत्यूमागचं खरं कारण आता समोर आलं आहे. पत्नीचे बाहेरील पुरुषासोबत असलेले अनैतिक संबंध आणि तिच्याकडून मिळणारा मानसिक त्रास याला कंटाळूनच या तरुणानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे.

काय आहे प्रकरण?

या दुर्दैवी घटनेत जीवनयात्रा संपवलेल्या तरुणाचं नाव गणेश दत्तू कोळी असं असून तो चंद्रपूर येथे तलाठी म्हणून कार्यरत होता. बीड येथील एका तरुणीशी त्याचा 13 मे रोजी मोठ्या उत्साहात विवाह झाला होता. मात्र, लग्न होऊन अवघे 12 दिवस उलटत नाही तोच त्यानं अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात राहत्या घरात गळफास लावून घेतला. 

आता या प्रकरणी गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी यांच्या फिर्यादीवरून त्याच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

( नक्की वाचा : NEET Paper Leak : सीबीआयच्या रडारवर आता कल्याणची विद्यार्थिनी; 'तो' मोबाईल नंबर ठरला तपासाचा मुख्य धागा )

कुलदैवत दर्शनावेळीच फुटलं भांडं

गणेशची पत्नी अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करते. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच या संसारात मोठा भूकंप झाला. आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर जेव्हा हे नवविवाहित जोडपे कुलदैवताच्या दर्शनाला गेले होते, तेव्हापासूनच पत्नीचे वागणे संशयास्पद होते. 

ती सतत कोणाशी तरी लपून फोनवर बोलत असे. घरात सत्यनारायणाची पूजा झाली, तरी तिच्या वागण्यात बदल झाला नाही. हे लग्न माझ्या मर्जीविरुद्ध झाले असून मला गणेशसोबत राहायचे नाही, असे सांगून ती थेट अंबाजोगाईला निघून गेली.

( नक्की वाचा : Pune News: पुण्यातील बड्या आयटी कंपनीत 'कॉर्पोरेट जिहाद'? लग्नासाठी आणि धर्मांतरासाठी महिला कर्मचाऱ्याचा छळ )

बहिणीला रडत फोन केला आणि....

 गणेश 24 मे रोजी त्याच्या पत्नीची समजूत काढण्यासाठी अंबाजोगाई येथे आला होता. त्यानंतर 25 मे रोजी गणेशने आपल्या बहिणीला फोन करून रडत एक भयानक गोष्ट सांगितली. पत्नीचे दुसऱ्या एका मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने आपल्या डायरीत याबद्दल लिहून ठेवल्याचं त्यानं सांगितलं. गणेशने ती डायरी स्वतः वाचली होती आणि याच मुद्द्यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. हा फोन झाल्यानंतर काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली.

पोलीस शिपाई ते तलाठी, कष्टाचा प्रवास संपला

गणेशचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अत्यंत संघर्षाचा होता. तो 2021 मध्ये राज्य राखीव पोलीस बलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्यानंतर पोलीस खात्यात नोकरी करत असतानाच त्याने तलाठी परीक्षेचा मोठा अभ्यास केला आणि 2024 मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली. अत्यंत कष्टाने स्वतःचे पाय रोवणाऱ्या या तरुण तलाठ्याचा संसाराची सुरुवात होण्यापूर्वीच असा करुण अंत झाल्यानं बीड जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. बीड पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com