
मोसीन शेख, प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे झालेल्या हत्येनंतर बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना वारंवार समोर येत आहे. आता बीडच्या गेवराईमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीडमध्ये एका पाच वर्षांच्या चिमुरडीला थेट गाईच्या गोठ्यात एखाद्या जनावराप्रमाणे बांधून ठेवण्यात आलं होतं. या चिमुरडीला आई नव्हती. अक्षरश: कलिंगडाच्या साली खाऊ ती गोठ्यात राहत होती. हा संतापजनक प्रकार बीडमधून समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीडमधील गेवराई तालुक्यातील एका गावामध्ये गतिमंद मुलीला चक्क जनावरांच्या गोठ्यात बांधून ठेवण्यात आले होते. या मुलीच्या आईचा मृत्यू झाला आहे आणि तिचे वडील व्यसनाधीन आहेत. मुलगी गतिमंद असल्याने तिच्या वडिलांनी तिला चक्क जनावरांच्या गोठ्यामध्ये पायाला दोरी बांधून ठेवलं होतं. गंभीर बाब म्हणजे तिला खाण्यासाठी केळी आणि टरबुजाच्या साली दिल्या जायच्या. मात्र एका महिलेच्या जागरुकतेमुळे या गतिमंद मुलीची सुटका झाली आहे. सध्या ही मुलगी छत्रपती संभाजी नगर येथील पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आली आहे.
नक्की वाचा - Crime News: आई बनली वैरीण! मांत्रिकाने कान भरले; महिलेने पोटच्या लेकाला नाल्यात फेकलं
कशी झाली चिमुरडीची सुटका?
तिच्या घराशेजारी राहण्यासाठी आलेल्या महिलेने हा प्रकार उघडकीस आणला. छत्रपती संभाजीनगरच्या या महिलेला गोठ्यातून मुलीच्या रडण्याचा आवाज आला. तिने गोठ्या जाऊन पाहिलं तर तिला धक्काच बसला. महिलेला तो प्रकार पाहावला नाही. त्यांनी चिमुरडीची सुटका केली. त्यांनी चिमुरडीला संभाजीनगर येथील अनाथालयात दाखल केले असून त्या ठिकाणी आता तिचे समुपदेशन देखील करण्यात आले. संभाजीनगर येथील दामिनी पथकाच्या सहकार्याने ही कार्यवाही करण्यात आली.
व्यसनी वडिलांना मुलगी डोईजड झाली होती, त्यामुळे मुलीचा नैसर्गिक मृत्यू होण्याच्या उद्देशाने त्याने तिचे हालहाल केले. त्यानंतर मुलीला संभाजीनगरमधील खालिद अहमद यांच्या अनाथ आश्रमात नेऊन सोडण्यात आले. खालिद यांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, आश्रमात सर्व मुलेच असल्याने अखेर पोलिसांच्या मदतीने तिला बाळ सुधार गृहात ठेवण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world