Kalyan Bike Racing Viral Video : कल्याणमधील गांधारी रिंग रोड हा मृत्यूचा सापळा बनलाय. स्टंटबाज वाहन चालक संध्याकाळच्या सुमारास भरधाव वेगाने या रोडवरून गाड्या चालवतात. तर कधी कधी हे चालक धोकादायक रेसिंगही लावतात. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांसह, इव्हिनिंग वॉक, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. या रस्त्यावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये काही लोकांना जीव गमवावा लागला आहे. अशातच तरुणांच्या दुचाकीच्या स्टंटबाजीच्या व्हिडीओमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्टंटबाज तरुणांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांकडून तात्पुरत्या उपाययोजना राबवल्या जातात. परंतु, अजूनही या रोडवर जीवघेण्या स्टंटबाजीचा थरार सुरूच असल्याचं व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. कल्याण गांधारी रिंग रोडवरील पुलावर धूम स्टाईलने बाईक चालवणाऱ्या तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, 'या' पिकांचं होणार मोठं नुकसान, कारण काय?
रिंग रोडवर सायकलिंग करणाऱ्या एका व्यावसायिकाचा मृत्यू
काल गुरुवारी रात्रीच्या वेळी काही तरुणांनी बाईकवरून स्टंटबाजी केल्याचं व्हिडीओत कैद झालं आहे. पोलिसांकडून अशा चालकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. रिंग रोडवर सायकलिंग करताना कल्याणमधील नामांकित व्यावसायिक श्रीनिवास तांदळे यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला होता. एका अल्पवयीन कार चालकाने तांदळे यांना पाठीमागून धडक दिली होती. या अपघातात ते गंभीरित्या जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.