Pune Municipal Corporation Election : पुण्यातील मंगळवार पेठ परिसरात राजकीय कार्यकर्त्याच्या वाढदिवस कार्यक्रमादरम्यान हाणामारीचा प्रकार घडल्याला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 जानेवारी 2026 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
नेमकं काय घडलं?
एफआयआरनुसार, तक्रारदार आणि त्यांचे मित्र भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणेश आल्हाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंगळवार पेठेतील एका ठिकाणी जमले होते. यावेळी तेथे आधीपासून उपस्थित असलेल्या भाजप आणि आरपीआय कार्यकर्त्यांमुळे प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत सांगर कांबळे या व्यक्तीनं भाजपाचे सर्व उमेदवार चोर असल्याचं म्हणत शिवीगाळ केली.
प्रभाग क्रमांक २४ मधील भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही करण्यात आला. यावेळी आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये एका आरोपीने उमेदवाराचा फोटो फाडून त्याच्या अंगावर थुंकल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
या प्रकरणात निनाद घोडे, संजय निमगुलकर, प्रतिक कांबळे, भरत शिंदे आणि सागर कांबळे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
हे सर्व आरोपी मंगळवार पेठ, पुणे परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. या घटनेचा तपास फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करत असून, पुढील तपास सुरू आहे.
कोण आहेत गणेश बिडकर?
गणेश बिडकर हे प्रभाग क्रमांक 24 मधील भाजपाचे उमेदवार आहेत. गेल्या 25 वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. 2002 साली ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. 2011 ते 2012 या काळात त्यांच्याकडे स्थायी समितीचे अध्यक्षपदही होतं. तिसऱ्या टर्ममध्ये त्यांना गटनेतेपद मिळालं. 2020 ते 2022 या काळात ते सभागृह नेते होते. भाजपाचा पुण्यातील कार्यकर्त्यांमधील चेहरा अशी गणेश बिडकर यांची ओळख आहे.
बिडकर विरुद्ध धंगेकर असा संघर्ष
पुण्यात भाजपा विरुद्ध शिंदे सेना विरुद्ध पवारांची एकत्र राष्ट्रवादी असा चुरशीचा सामना महापालिकेसाठी होतोय. प्रभाग क्रमांक 24 मध्ये बिडकर विरुद्ध शिंदे शिवसेनेचे रविंद्र धंगेकर असा संघर्ष रंगलाय. प्रभाग क्रमांक 24 मधून रविंद्र धंगेकरांचे पुत्र प्रणव धंगेकरही रिंगणात आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 24 च्या लढतीकडे शहराचं लक्ष लागलेलं आहे. भाजपा आणि रिपाईच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या वादामुळं या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
