अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी
Chandrapur Crime News Today : चंद्रपूरच्या दुर्गापूर परिसरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे.एका प्रियकराने मोबाईल चार्जरच्या वायरने प्रेयसीचा गळा आवळला आणि तिची हत्या केली. ही घटना चंद्रपूर शहरालगत असलेल्या दुर्गापूर परिसरात घडली. प्रियंका वांढरे असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर अंकेश बहीरवार असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रियंका पतीपासून विभक्त राहून प्रियकर अंकेश बहीरवार (22) याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. अंकेश प्रियंकापेक्षा 7 वर्षांनी लहान होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून खटके उडत होते. 'प्रियंका माझ्यावर नियंत्रण ठेवते आणि घरच्यांशी बोलू देत नाही'अशा संशयातून अंकेशने 14 मार्च 2026 च्या रात्री प्रियंकाचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला.हत्या केल्यानंतर अंकेशने हा आत्महत्येचा प्रकार वाटावा असा बनाव रचला. त्याने प्रियंकाच्या वडिलांना फोन करून सांगितलं की,"प्रियंका बोलत नाहीये, तिने मान टाकली आहे." कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले,मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
नक्की वाचा >> Ratnagiri News: जगबुडी नदीच्या पुलावर केमिकलचा टँकर पलटी, मुंबई-गोवा हायवेवरून जाणाऱ्या प्रवाशांनी सावध राहा
पोस्टमार्टम रिपोर्टने पोलिसही हादरले
सुरुवातीला सर्वांना ही घटना आत्महत्येची वाटली. पण प्रियंकाचा शवविच्छेदन अहवालात सत्य समोर आलं आणि पोलिसांनाही धक्का बसला.अहवालात प्रियंकाचा मृत्यू श्वास गुदमरल्याने म्हणजेच गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अंकेशला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला मोबाईल चार्जर आणि एक्स्टेंशन बोर्ड जप्त केला आहे.आरोपी अंकेश बहीरवार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो आता पोलिसांच्या कोठडीत आहे पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहेत.
नक्की वाचा >> Chhatrapati Sambhaji Nagar News: तळ्यात मासेमारी करताना काळाने झडप घातली, 2 मेहुण्यांसोबत भयंकर घडलं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world