
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिचा नवरा शशांक, सासू लता, नणंद करिष्मा हे पोलिस कोठडीत होते. आता त्यांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत झाली आहे. ते आता जामीनासाठी अर्जही करु शकतात. पण जामीन मिळण्या आधीच त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. वैष्णवीची सासू लता आणि नवरा शशांक हगवणे यांच्या विरोधात म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. जेसीबी मशीनच्या व्यवहार प्रकरणी 11 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत यळवंडे यांनी लता हगवणे यांच्या नावावर असलेला जेसीबी 24 लाख रुपयांना खरेदी केला होता. ही खरेदी 2022 साली करण्यात आली होती. यासाठी शशांक हगवणे याला 5 लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात ही घेतला होता. या जेसीबी वर बँकेचे 19 लाख रुपयांचे कर्ज होते. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी यळवंडे हे शशांक हगवणे याला दर महिन्याला 50 हजार रुपये देत होते. त्यानुसार लता हगवणे यांच्या बँक खात्यात 6 लाख 70 हजार रुपये यळवंडे यांनी भरले होते.
पण ही रक्कम हगवणे यांनी बँकेला हप्ते देण्यासाठी भरलीच नाही. उलट ती स्वतः वापरली. त्यामुळे 2024 मध्ये बँकेने हा जेसीबी यळवंडे यांच्या ताब्यातून काढून घेतला. पुढे तो शशांक हगवणे याने सोडवून आणला. पण जेसीबी यळवंडे यांना दिला नाही. उलट तू आमचा जेसीबी 14 महिने वापरला. तुला तुझे पैसे मिळणार नाही असं फटकारल. ऐवढच नाही तर कंबरेला लावलेल्या बंदुकीचा ही धाक दाखवत, पैसे मागू नकोस तुझ्या घरचे नीट राहाणा नाहीत अशी धमकी ही त्याने दिली होती असे यळवंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
वारंवार पाठ पुरावा करूनही 11 लाख 70 हजार रुपये मिळत नसल्याने यळवंडे यांनी आज पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे. त्यामुळे जरी वैष्णवी हगवणे प्रकरणात लता आणि शंशांक हगवणे यांना जामीन मिळाला तर लगेचच म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस त्यांचा ताबा घेवू शकतात. त्यामुळे या दोघांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय हगवणे कुटुंबाचे एकएक कारनामेही यानिमित्ताने ही उघड होत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world