जाहिरात

CCTV VIDEO 'बेस्ट पोलीस स्टेशन'चे सत्य! विद्यार्थ्याला किडनॅप करत खोट्या प्रकरणात अडकवले, व्हिडीओनं बिंग फुटले

Fake Drug Case : 'अंमली पदार्थांची मोठी कारवाई' असल्याचा पोलिसांचा दावा आता पूर्णपणे खोटा ठरला ठरला आहे.

CCTV VIDEO 'बेस्ट पोलीस स्टेशन'चे सत्य! विद्यार्थ्याला किडनॅप करत खोट्या प्रकरणात अडकवले, व्हिडीओनं बिंग फुटले
Fake Drug Case : पोलिसांनी 18 वर्षांच्या मुलाला खोट्या केसमध्ये अडकवलं होतं.
मुंबई:

Fake Drug Case : देशातील पोलीस यंत्रणेला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या पोलीस स्टेशननं काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरीसाठी गौरव प्राप्त केला, त्याच पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी एका निष्पाप विद्यार्थ्याला जाळ्यात ओढून कायद्याचा आणि अधिकाराचा घृणास्पद गैरवापर केल्याचे उघड झाले आहे.

'अंमली पदार्थांची मोठी कारवाई' असल्याचा पोलिसांचा दावा आता पूर्णपणे खोटा ठरला असून, या संपूर्ण प्रकरणाचे सत्य उच्च न्यायालयासमोर येताच, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला ही केस बनावट असल्याचे कबूल करण्याची नामुष्की आली.

काय आहे प्रकरण?

12 वीच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून अंमली पदार्थांच्या तस्करीच्या खोट्या प्रकरणात अडकवल्याचा हा गंभीर प्रकार आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर येथील मालहरगढ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी केलेला हा गैरप्रकार सीसीटीव्ही आणि व्हिडिओ पुराव्यांमुळे उघड झाला.

( नक्की वाचा : Pune News : एक बाई आणि 12 भानगडी! ॲसिड हल्ला ते पुरुषांवर जबरदस्ती ! 'या' बाईची संपूर्ण पुण्यात चर्चा )

अपहरणाची घटना आणि खोटी कहाणी

या घटनेतील पीडित विद्यार्थी सोहन (वय 18) मालहरगढ येथील रहिवासी आहे.29 ऑगस्ट रोजी त्याला काही पोलिसांनी एका धावत्या बसमधून जबरदस्तीने खाली उतरवले. यानंतर काही तासांनी पोलिसांनी त्याला 2.7 किलोग्राम अफूसह पकडल्याचे जाहीर केले. दुसऱ्याच दिवशी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तुरुंगात पाठवले.

व्हिडिओ पुरावे आणि सत्य उघड

पोलिसांनी केलेल्या अटकेच्या दाव्यांमध्ये तथ्य नव्हते. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीनुसार, घटनास्थळी कोणतेही अंमली पदार्थ दिसले नाहीत, तसेच पाठलाग किंवा जप्तीची कोणतीही कारवाई झाली नाही. साध्या वेशातील पोलिसांनी बस थांबवून विद्यार्थ्याला ओढून बाहेर काढले आणि त्याला घेऊन तेथून निघून गेले, हे स्पष्टपणे पुराव्यांतून समोर आले.

उच्च न्यायालयात सुनावणी आणि एसपींची कबुली

सोहनच्या कुटुंबाने 5 डिसेंबर रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात धाव घेतली आणि मुलाचे बेकायदेशीर अपहरण झाल्याचे व पुरावे बनावट तयार केल्याचे आरोप केले. मंगळवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने मंदसौरचे पोलीस अधीक्षक (SP) विनोद कुमार मीणा यांना व्यक्तिशः हजर राहण्याचे निर्देश दिले.

एसपी मीणा यांनी न्यायालयात कबूल केले की, सोहनला मालहरगढ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनीच बसमधून उचलले होते. प्रथम माहिती अहवालात (FIR) दाखवलेली अटकेची वेळ आणि जागा, व्हिडिओमध्ये कैद झालेल्या प्रत्यक्ष घटनेच्या वेळ आणि जागेला जुळत नाही.

पोलिसांचे षड्यंत्र

या संपूर्ण प्रकरणाचे नेतृत्व मालहरगढ पोलिस ठाण्यातील एका हेड कॉन्स्टेबलने केले होते. विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल होण्यापूर्वीच त्याला बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आले होते. एसपी मीणा यांनी यापूर्वी जिल्हा प्रशासनाने केलेले विधान खोटे ठरवत, बसमध्ये चढलेले सर्व कर्मचारी मालहरगढ पोलीस स्टेशनमधील असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यांनी कबूल केले की, तपास कायदेशीर प्रक्रियेनुसार करण्यात आला नाही.

या घटनेमुळे झालेल्या बदनामीनंतर, एसपी मीणा यांनी न्यायालयात सांगितले की, त्यांनी बसमधून विद्यार्थ्याला ओढून काढणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सहा मालहरगढ पोलिसांना निलंबित केले असून त्यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणावर न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला आहे. वरिष्ठ वकील हिमांशु ठाकूर यांनी सांगितले की, "न्यायालयाने सर्व पुरावे स्वीकारले आहेत. सोहनला बसमधून बेकायदेशीरपणे किडनॅप केले गेले आणि संध्याकाळी 5 वाजता 2.7 किलोग्राम अफूसह अटक केल्याचे खोटे दाखवले गेले, हे मान्य करण्यात आले आहे. सोहन हा बारावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला हुशार विद्यार्थी आहे. मालहरगढ पोलिसांनी कायद्याच्या बाहेर जाऊन हे कृत्य केले, हे एसपींनी न्यायालयात कबूल केले आहे." कायदेतज्ज्ञांच्या मते, उच्च न्यायालयाकडून या प्रकरणी कठोर कारवाई अपेक्षित आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com