Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त किरकोळ वादातून निष्पाप शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला आहे असा आरोप मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
१० ते १५ जणांच्या जमावाकडून शिक्षकाला बेदम मारहाण...
वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे यांचा मध्यरात्री झालेल्या वादानंतर मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री त्यांच्या घराबाहेर मोठा गोंधळ सुरू असल्याचा आवाज ऐकून शिक्षक सुरेश बोरसे बाहेर आले. यावेळी काही जण मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असल्याचं दिसून आलं. बोरसे यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचाच राग आल्याने १० ते १५ जणांच्या जमावाने त्यांच्यावर बेदम हल्ला केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सुरेश बोरसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
दरम्यान पोस्टमार्टममध्ये शिक्षकाचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला असा दावा पोलिसांनी केला आहे. तर शिक्षकाला मारहाण झाली नसल्याची माहिती छत्रपती संभाजी नगर ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. दरम्यान याबाबत सखोल तपास सुरू आहे. कुणी दोषी असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान कारवाईच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांकडून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे देखील उपस्थित होते. पोलिसांच्या भूमिकेमुळे शिक्षकाचा हृदयविकाराने झटका येऊन मृत्यू झाला असा दावा करण्यात आल्याचं दानवेंनी म्हटलं आहे.
.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world