
Chhatrapati Sambhajinagar News: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीतील दोघांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, या दरोडेखोरांच्या कारमध्ये चक्क पोलीस सायरन, अंबर दिवा आणि लाठीसारखं साहित्य आढळून आलं आहे. पोलिसांनी ही कारवाई वैजापूर हद्दीत केली असून, अंधाराचा फायदा घेऊन इतर चार आरोपी फरार झाले आहेत.
कसं उघड झालं प्रकरण?
छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, मुंबई-नागपूर हायवेवरील बेलगाव शिवारात एका 'ह्युंडाई वरना' कारमध्ये काही संशयित लोक दरोड्याच्या तयारीत आहेत. ही माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि अचानक छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी अमोल साईराम गायकवाड आणि गोविंद निवृत्ती पवार या दोघांना जागीच पकडले, तर त्यांचे इतर चार साथीदार मक्याच्या शेतातून पळून गेले.
( नक्की वाचा : Chhatrapati Sambhajinagar: 'त्या' क्लिपने पोलिसांना खुन्यापर्यंत पोहोचवले; 'हेडलेस' मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश )
कारमध्ये सापडले दरोड्याचे साहित्य
पोलिसांनी पकडलेल्या कारची तपासणी केली असता, त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. गाडीमध्ये दरोडा टाकण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासोबतच पोलिसांसारखे भासणारे साहित्यही सापडले. यात खालील वस्तूंचा समावेश होता:
एक गावठी कट्टा आणि 1 जिवंत काडतूस
नायलॉनची दोरी, वायर आणि पत्रे कापण्याचे कटर
हातोडी, छन्नी, लोखंडी पकड, पाना, सळई, चाकू
CCTV कॅमेरावर मारायचा काळ्या रंगाचा स्प्रे, एक्सा ब्लेड
चेहऱ्यावर घालण्याचे मास्क, मिरची पावडर
अंबर दिवा, सायरन आणि पोलीस लाठी
या प्रकरणात पोलिसांनी एकूण 1,59,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना वैजापूर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. यामुळे पोलीस वेशातील दरोड्याचा मोठा कट उधळला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world