
कामावर असलेल्या महिलांना आपल्या बाळाला दुध पाजता यावे यासाठी ठिकठिकाणी हिरकणी कक्ष काढण्यात आले आहेत. मात्र याचा वापर स्तनपानासाठी कमी आणि बाकीच्या उद्योगांसाठीच जास्त होतोय की काय असं प्रकरण आता समोर आले आहे. या हिरकणी कक्षाचा वापर चक्क मद्यपानासाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरमध्ये हा प्रकार घडल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे इथलं वातावरण चांगलेच तापले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उल्हासनगरात महापालिकेची शाळा आहे. या शाळेच्या आवारात हिरकणी कक्ष आहे. याच कक्षात अज्ञात इसमांकडून दारूची पार्टी केली जात होती. ज्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळाली त्यावेळी ते हिरकणी कक्षात पोहोचले. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हे हिरकणी कक्ष स्तनपानासाठी आहेत? की मद्यपानासाठी? असा सवाल राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील फॉलोवर लेन परिसरात उल्हासनगर महापालिकेची शाळा क्रमांक 29 आहे. या शाळेच्या आवारात उल्हासनगर महापालिकेचे 3 हिरकणी कक्ष ठेवण्यात आले आहेत. यापैकीच एका कक्षात दुपारच्या सुमारास काही इसम दारू पीत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांना मिळाली होती. हा माहिती धक्कादायक होती. त्यामुळे सत्य काय आहे हे तपासणे गरजेचे होते. त्यामुळे नरेश हे त्यांच्या सहकाऱ्यांसह तिथे पोहोचले.
त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे धाव घेतली. त्यावेळी दारू पिणारे इसम तिथून पळून गेले. मात्र जाताना दारूच्या बाटल्या तिथेच सोडून गेले. हे इसम नेमके कोण होते? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. काही जणांच्या मते ते महापालिकेचेच सफाई कामगार असल्याचं बोललं जातंय. या सगळ्या संतापजनक प्रकारानंतर शाळेच्या आवारात हा प्रकार सुरू असतानाही शाळा प्रशासनाला त्याची माहिती कशी नव्हती? हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
शाळेला महापालिकेची सुरक्षाव्यवस्था नव्हती का? असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा प्रकार अतिशय घातक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नरेश गायकवाड यांनी दिली आहे. तसंच या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे. शिवाय हिरकणी कक्षाचा असा वापर होत असेल तर त्याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world