ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी
Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर शहरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. आरधवाडी गल्ली भागातील वंदना जाधव यांचे १८ एप्रिल रोजी निधन झाल्यानंतर त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलं होतं. मात्र आज पहाटे कुटुंबीय राख सावडण्यासाठी स्मशानभूमीत गेले असता अंत्यविधीनंतरची राखच चोरीला गेल्याचं समोर आलं आहे. इतकच नव्हे तर मृतदेहाची कवटीही गायब असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. भोंदूबाबाच्या सांगण्यावरुन स्मशानभूमीतून कधी राग तर हाडं चोरली जातात. पैशांचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत हे गैरकृत्य केलं जात असल्याच्या तक्रारीही केल्या जातात. त्यातच धाराशिवच्या घटनेने पुन्हा एकदा संताप व्यक्त केला जात आहे.
अंधश्रद्धेचं कृत्य केल्याची भीती....
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्याची माहिती स्थानिकांकडून समोर येत आहे. त्यामुळे या मागे कोणते तरी संगनमत किंवा अंधश्रद्धेचा प्रकार तर नाही ना, अशीही चर्चा सुरू झाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून स्मशानभूमीची सुरक्षा व्यवस्था कितपत सक्षम आहे, यावरही सवाल उपस्थित होत आहेत. या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे. लवकरच या संदर्भात पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या विचित्र आणि गंभीर प्रकारामुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world