नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule News : लग्न लावून देत नसल्याच्या रागातून एका रिक्षाचालकाने स्वतःच्या वृद्ध आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला पेटवून दिल्याची हृदयद्रावक घटना मध्यरात्री घडली. गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. महिंदळे (ता. धुळे) येथे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. जिजाबाई भटू खैरनार - पाटील (65) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
माझं लग्न का लावून देत नाही म्हणत आईला पेटवलं...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिजाबाई खैरनार या आपला मुलगा प्रदीपचा विवाह लावून देत नसल्याचा राग प्रदीपच्या मनात होता. याच कारणामुळे त्याच्या मनात आई विषयी तीव्र संताप निर्माण झाला होता. काल मध्यरात्रीच्या सुमारास प्रदीप खैरनार हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. "माझं लग्न का लावून देत नाही?" असा जाब विचारत त्याने आईशी वाद घातला. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर प्रदीपने जिजाबाई खैरनार यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिल्याचा आरोप आहे..
याप्रकरणी धुळे तालुका पोलिसांनी संशयित प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार-पाटील (45) याला ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून संशयित प्रदीप उर्फ दगडू खैरनार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world