नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule News : धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या राधाकृष्ण लॉजवर पोलिसांची मोठी आणि खळबळजनक कारवाई समोर आली आहे. देवपूर भागातील जीटीपी स्टॉप येथील राधाकृष्ण लॉजवर देवपूर पोलिसांनी अचानक धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत अत्यंत संतापजनक गोष्टी समोर आल्या आहेत. या लॉजवर मोठ्या संख्येने तरुण-तरुणी आढळले. या तरुणांनी पुन्हा अशा प्रकारचं कृत्य करू नये यासाठी पोलिसांनी मुलांच्या पालकांना बोलावल्याचं सांगितलं जात आहे.
नगरसेवकांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
या कारवाईदरम्यान लॉजमधून काही तरुण आणि तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेली मुलं-मुली हे 20 वर्षावरील असल्याचं सांगून त्यांच्या पालकांना समज देऊन सोडून देणार असल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितले. स्थानिक नगरसेवक ललित माळी यांनी या अवैध प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देवपूर आणि आसपासच्या परिसरात बेकायदेशीर लॉजिंग व्यवसाय आणि संशयास्पद कॅफेचे जाळे वेगाने पसरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या ठिकाणी होणाऱ्या अश्लील आणि बेकायदेशीर कृत्यांमुळे परिसरातील कौटुंबिक वातावरण दूषित होत असून शाळकरी आणि महाविद्यालयीन तरुणांवर याचा वाईट परिणाम होत असल्याची तीव्र भावना नगरसेवक ललित माळी यांनी व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world