स्वानंद पाटील
बीड जिल्ह्यातील अनेक गावात सध्या अज्ञात ड्रोनची दहशत दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. कोणी चोरीच्या उद्देशाने हे करत नाही ना? या भितीपोटी गावच्या गावं रात्री जागी राहात आहेत. हा प्रकार सध्याचा नाही तर गेल्या एक महिन्यापासून असे होत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशाच पद्धतीने ड्रोन घिरट्या घालत आहेत. ड्रोनच्या माध्यमातून चोरी करण्याचा उद्देश असल्याची अफवा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या संदर्भात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलीस प्रशासनाला पत्र लिहीले आहे. या ड्रोन संदर्भात खरी माहिती लोकांना सांगावी असे आवाहन त्यांनी केले आहे. तर माजी आमदार सुरेश धस यांनी फेसबुक लाईव्ह करत नागरिकांना याबाबत माहिती द्यावी असे आवाहन केले आहे. दरम्यान अशाच पद्धतीचे बीड,गेवराई,आष्टी,धारूर ,वडवणी तालुक्यातील वेगवेगळ्या गावात ड्रोन घीरट्या घालत आहे. मात्र त्याबाबत कोणीही अधिकृत माहिती देण्यास तयार नाही. त्यामुळे भितीचे सावट सध्या गावात दिसत आहे.
रात्री बीडच्या काजळा तांदळा गावात अशाच पद्धतीचे ड्रोन घिरट्या घालत होतं. त्यावेळी गावातील तरुणांनी या ड्रोनचा पाठलाग केला. नेमके हे ड्रोन कशाचे आहेत. ते वारंवार गावावरती घिरट्या का घालतात. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम पसरला आहे. पोलीसही याबाबत काही सांगायला तयार नाहीत. त्यामुळे अफवांचे पेवही मोठ्या प्रमाणात फुटले आहे. प्रत्येक गावातील नागरिक रात्र जागून काढत आहेत. लोकप्रतिनिधींनीही आता सत्य काय आहे हे सांगावे असे आवाहन पोलीसांना केले आहे.
मात्र असे काही ड्रोन बीड जिल्ह्यातील गावात घिरट्या घालत आहेत. याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती पोलीसांकडे नाही. त्यामुळे अशा तक्रारीने पोलीस प्रशासनही संभ्रमात आहे. पोलीसांकडे या विषयी वारंवार विचारणा करण्यात आली आहे. पण त्यांच्याकडे याचे कोणतेही उत्तर नाही. शेवटी आता या प्रकरणात स्थानिक लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे आतातरी सत्य काय आहे हे बाहेर येईल अशी अपेक्षा गावकरी करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world