जाहिरात

Kalyan News: तुमच्याही घरी असा इलेक्ट्रिशियन येतोय का? कल्याणमध्ये महिलेला बसला 3 लाखांचा फटका

Kalyan News: घरातील वीज मीटरमध्ये बिघाड झाला असून तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते, अशी भीती दाखवून दोन खाजगी इलेक्ट्रिशियननी एका महिलेला लुबाडले.

Kalyan News: तुमच्याही घरी असा इलेक्ट्रिशियन येतोय का? कल्याणमध्ये महिलेला बसला 3 लाखांचा फटका
Kalyan News: कल्याणमधून फसवणुकीची एक  धक्कादायक घटना समोर आली आहे. (प्रतिकात्मक फोटो)
कल्याण:

Kalyan News: कल्याणमधून फसवणुकीची एक  धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील वीज मीटरमध्ये बिघाड झाला असून तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते, अशी भीती दाखवून दोन खाजगी इलेक्ट्रिशियननी एका महिलेला लुबाडले आहे. कारवाई टाळण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगून या भामट्यांनी तब्बल 3 लाख 10 हजार रुपये उकळले. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

कल्याण पश्चिमेकडील दीपक पॅराडाईज इमारतीत राहणाऱ्या 55 वर्षीय स्नेहा निपूर्ते यांच्यासोबत हा प्रकार घडला. 8 मे 2023 ते 24 मे 2023 या कालावधीत शशिकांत शेलार आणि नितीन नागो ठाणेकर या दोन खाजगी इलेक्ट्रिशियननी निपूर्ते यांच्याशी संपर्क साधला. तुमच्या घरातील वीज मीटरमध्ये फॉल्ट आहे आणि त्यामुळे महावितरण तुमच्यावर कडक कारवाई करेल, अशी भीती त्यांनी घातली. 

या कारवाईपासून वाचवायचे असेल तर अधिकाऱ्यांना मॅनेज करावे लागेल, असे सांगून त्यांनी निपूर्ते यांच्या मुलाकडून ऑनलाईन पद्धतीने एकूण 3 लाख 10 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले.

(नक्की वाचा : Dombivli News : ना भेट,ना बोलणं , थेट लॉजवर बोलावणं, डोंबिवलीच्या जावेदचा नातेवाईकांनी केला 'करेक्ट कार्यक्रम' )

मदतीच्या बहाण्याने गंडा

विशेष म्हणजे, तक्रारदार महिलेला महावितरणकडून एक अधिकृत नोटीस आली होती. ही बाब आरोपींना समजताच त्यांनी आपण मदत करू असे भासवले. तपासात असे समोर आले आहे की, आरोपींनी महावितरणची खरी दंडात्मक फी भरली होती, मात्र त्या रकमेपेक्षा कित्येक पटीने जास्त रक्कम त्यांनी या कुटुंबाकडून लाटली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्नेहा निपूर्ते यांनी पोलिसांत धाव घेतली.

( नक्की वाचा : Chhatrapati Sambhajinagar: आधी हसून-खेळून फोटो काढले, मग चाकूने सपासप वार करून मित्राचा खेळ खल्लास ! )

दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी शशिकांत शेलार आणि नितीन नागो ठाणेकर या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकारी विजय गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अशा प्रकारे कोणी कारवाईची भीती दाखवून पैशांची मागणी करत असेल, तर नागरिकांनी थेट महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com