अमजद खान/ डोंबिवली
Crime News: डोंबिवलीमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर एका तरुणाच्या मृत्यूबाबतचे धक्कादायक वास्तव पोलीस तपासाद्वारे समोर आले आहे. घरातील शिडीवरून पडून जखमी झाल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांना सुरुवातीस देण्यात आली होती. पण या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला नव्हता तर त्याची हत्या करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांनीच त्याचा जीव घेतला. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये खळबळ उडाली आहे.
(नक्की वाचा: मतदानापूर्वीच हिंसाचार, लग्नसोहळ्यावरून परतणाऱ्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या)
वडिलांनीच मुलाचा का घेतला जीव?
हत्या करण्यात आलेला तरुण दररोज दारू पिऊन आईवडिलांना बेदम मारहाण करत असे. अखेर कंटाळलेल्या वडिलांवर आपल्या 30 वर्षीय मुलाचा जीव घेण्याची वेळ आली. हरेश पाटील (वय 30 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. डोंबिवली पश्चिमेकडील सरवरनगर परिसरात अभिमन्यू पाटील पत्नी व दोन मुलांसह राहत होते. त्यांचा धाकटा मुलगा हरेश पाटीलला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत घरी येऊन तो आईवडिलांशी वाद घालायचा आणि त्यांना मारहाण देखील करायचा.
(नक्की वाचा: सख्खा शेजारी पक्का वैरी! क्षुल्लक वादाचा असा घेतला बदला की संपूर्ण सोसायटी हादरली)
मंगळवारी रात्री नेमके काय घडले?
मंगळवारी (23 एप्रिल) देखील याच गोष्टी घडल्या, पण यावेळेस अभिमन्यू पाटील यांचा स्वतःवरील संयम सुटला. मंगळवारी देखील हरेशचे पालकांसोबत भांडण झाले. वादाला कंटाळून त्याची आई घरातून बाहेर पडली आणि कुठेतरी निघून गेली. यानंतर घरी येताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हरेश घरामध्ये जखमी अवस्थेत पडला होता. याबाबत विष्णूनगर पोलिसांना माहिती देण्यात आली.
(नक्की वाचा: प्रेमविवाहमुळे आई नाराज, भरकार्यक्रमात लेकीच्या अपहरणाचा असा रचला डाव Video)
वडिलांनी कशी केली मुलाची हत्या?
अभिमन्यू पाटील यांनी रोजच्या कटकटीला कंटाळून हरेशला बेदम मारहाण केली. यानंतर नायलॉनच्या दोरीने गळा आवळला. यामध्येच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी हरेश पाटीलचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला. तपासादरम्यान अभिमन्यू पाटील यांनी सांगितले की, घराला लागून असलेल्या शिडीवरून पडून हरेश जखमी झाला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. पण पोलीस तपासामध्ये धक्कादायक खुलासा करण्यात आला.
अखेर वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल
प्रकरणाचा तपास डोंबिवली विभागाचे एसीपी सुनिल कुऱ्हाडे, विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दीपविजय भवार यांनी केला आणि तपासादरम्यान वेगळेच सत्य समोर आले. हरेशची हत्या त्याचे वडील अभिमन्यू पाटील यांनीच केली होती. हरेश दररोज दारूच्या नशेत आईवडिलांना शिवीगाळीसह मारहाणही करायचा. अखेर मंगळवारी हा वाद विकोपाला गेला आणि वडिलांनी टोकाचे पाऊल उचलले. अभिमन्यू यांनी एका दांडक्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हरेशच्या डोक्यावर प्रहार केला. यामध्ये तो जखमी झाला आणि खाली कोसळला. यानंतर त्यांनी नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी अभिमन्यू पाटील यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
VIDEO: Salman Khan च्या घरावर गोळीबार, अटक झालेल्या आरोपींचा बिश्नोई गँगशी काय संबंध?