जाहिरात

Jalna : आधी रील बनवून पोलिसांना नडला, खाक्या दाखवताच माफिया 'भाऊ' ढसाढसा रडला; जालन्यातील प्रकारची एकच चर्चा

Jalna News:  ज्या हातांनी पोलिसांना चिडवण्यासाठी रील बनवले होते, त्याच हातांनी कान धरून माफी मागण्याची वेळ या वाळू माफियावर आली आहे.

Jalna : आधी रील बनवून पोलिसांना नडला, खाक्या दाखवताच माफिया 'भाऊ' ढसाढसा रडला; जालन्यातील प्रकारची एकच चर्चा
Jalna News:  जालन्यातील हा संपूर्ण थरार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
जालना:

Jalna News:  जालना जिल्ह्यात एका वाळू माफियाची मुजोरी त्याला चांगलीच महागात पडली आहे. कायद्याच्या कचाट्यातून सुटल्यानंतर पोलिसांनाच आव्हान देणं या बहाद्दराला इतकं जड गेलं की, पोलिसांचा खाक्या पाहताच तो ढसाढसा रडायला लागला. ज्या हातांनी पोलिसांना चिडवण्यासाठी रील बनवले होते, त्याच हातांनी कान धरून माफी मागण्याची वेळ या वाळू माफियावर आली आहे. जालन्यातील हा संपूर्ण थरार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

जेसीबी सुटला अन् वाळू माफियाचा माज वाढला

जाफराबाद तालुक्यातील देवलझारी शिवारात 13 एप्रिल रोजी पोलिसांनी अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी मोहीम राबवली होती. या कारवाईत पोलिसांनी एक ट्रॅक्टर आणि एक जेसीबी जप्त केला होता. 

या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले होते. मात्र, संबंधित आरोपीने न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार आपला जेसीबी पोलीस ठाण्यातून सोडवून घेतला. इथपर्यंत सगळं कायदेशीर सुरू होतं, पण खरी गडबड जेसीबी पोलीस ठाण्याच्या गेटबाहेर निघताना सुरू झाली.

( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये कराटे शिकवणाऱ्या कोचचा नऊ वर्षांच्या मुलीवर डोळा, मुलींना घरी बोलावून करायचा... )

पोलिसांना दिलं आव्हान

पोलीस ठाण्यातून जेसीबी बाहेर काढताना चालक आणि वाळू माफियांनी चक्क रील बनवायला सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी गावात जाऊन फटाके फोडत जल्लोष केला. सोशल मीडियावर "झूला झूला मगर बाप को..." आणि "धोका मत खाओ, कार्यक्रम शांततेत होईल 100 टक्के" असा मजकूर असलेले स्टेटस ठेवून पोलिसांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला. कायद्याचा धाक नसल्यासारखे वागणारे हे वाळू माफिया पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे करत होते.

आणि माफियाचा 'भाऊ' रडला

आपल्याला आव्हान देणाऱ्या या वाळू माफियाची मुजोरी पोलिसांनी गांभीर्याने घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत जेव्हा या टोळीला आपला हिसका दाखवला, तेव्हा मात्र सर्व माज क्षणात उतरला. 

जो माफिया रीलमध्ये पोलिसांना आव्हान देत होता, तोच पोलिसांसमोर कान धरून उभा राहिला. आपण चुकलो, यापुढे पोलीस आणि प्रशासनाचा सन्मान राखू, असं म्हणत तो ढसाढसा रडायला लागला. पोलिसांना रील बनवून डिवचणं या वाळू माफियांना चांगलंच महागात पडलं आहे.


या कारवाईदरम्यान रेती माफियांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांवर खंडणीचे आरोप करून पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचाही प्रयत्न केला होता. यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं होतं. मात्र, पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून केलेल्या कारवाईमुळे आणि माफियांचा माज उतरवल्यामुळे जिल्ह्यात पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे. वाळू माफियांची ही दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस आता अधिक सतर्क झाले आहेत.

ग्रामीण भागात कायद्याचा धाक गरजेचा

जालना जिल्ह्यातील देवलझारी आणि परिसरात अवैध रेती उत्खननाचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी वाळू माफियांकडून पोलिसांना सार्वजनिकपणे आव्हान दिलं जात असल्यानं सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र, पोलिसांनी ज्या पद्धतीने या माफियांची मस्ती उतरवली, त्यामुळे पुन्हा एकदा कायद्याचा धाक निर्माण झाला आहे. रील बनवण्याच्या नादात पोलिसांशी पंगा घेणं किती महागात पडू शकतं, याचा धडाच या घटनेतून इतर गुन्हेगारांना मिळाला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com