Kalyan News: कल्याणमध्ये एका संतापजनक घटना घडली आहे. ज्या प्रशिक्षकावर पालकांनी आपल्या मुलीच्या सुरक्षेची आणि प्रशिक्षणाची जबाबदारी सोपवली होती, त्याच कराटे प्रशिक्षकाने एका नऊ वर्षांच्या चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण असून, या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने इतरही काही मुलींसोबत असं कृत्य केल्याचा दाट संशय आता व्यक्त केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. गिरीश वाघमारे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पीडित नऊ वर्षांची मुलगी याच्याकडे कराटेचे धडे गिरवत होती.
दोन दिवसांपूर्वी आरोपीने इतर मुली सरावासाठी आल्या आहेत असं सांगून पीडितेल आपल्या घरी बोलावलं. मात्र, मुलगी घरात गेल्यावर तिथे कोणीही नसल्याचं पाहून आरोपीने तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
( नक्की वाचा : Dombivli News: नवऱ्यानं आधी घरातील सिलेंडर लांबवला, आता पत्नीला सांगतोय ‘धंदा कर'; डोंबिवलीतील संतापजनक प्रकार )
दोनदा अत्याचाराचा प्रयत्न आणि...
पीडित मुलीने घरी गेल्यावर आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. विशेष म्हणजे, आरोपीने यापूर्वीही तिच्यासोबत अशाच प्रकारचं कृत्य केल्याची माहिती मुलीने दिली. हे ऐकून संतप्त झालेल्या पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी थेट आरोपीचं घर गाठलं आणि आपला रोष व्यक्त केला.
या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी तातडीने धाव घेत आरोपी गिरीश वाघमारे याला ताब्यात घेतलं.
पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. केवळ ही एकच मुलगी की आरोपीने प्रशिक्षणासाठी येणाऱ्या इतरही अल्पवयीन मुलींसोबत असे प्रकार केले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपीच्या या कृत्यामुळे क्रीडा क्षेत्रात आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
( नक्की वाचा : Kalyan News: शेण थेट ड्रेनेजमध्ये? कल्याणमधील 'त्या' तबेला मालकांना महापालिकेचा दणका; 21 जणांची नावं समोर )
शिवसेना ठाकरे गट आक्रमक
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवक आक्रमक झाले आहेत. संकेश भोईर, स्वप्नाली केणे, अर्पणा भोईर, विनोद केणे आणि शहरप्रमुख बाळा परब यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून आरोपीवर अत्यंत कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
संतप्त कार्यकर्त्यांनी आरोपीला आमच्या समोर आणा अशी मागणी देखील केली, मात्र पोलिसांनी परिस्थिती हाताळत संबंधितांची समजूत काढली आणि कायद्यानुसार कडक शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world