अद्यापही अक्षय शिंदेचा मृतदेह दफन ( Akshay Shinde Burial Ground) करण्यासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे यासाठी राज्य सरकारने (State Government) पुढाकार घेतल्याचं समजते. अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी राज्य सरकार जागा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आहे. राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात (High Court) ग्वाही देण्यात आली. सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते.
कथित पोलीस एन्काऊंटर मध्ये मारला गेलेला बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी जागा शोधण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अक्षय शिंदेच्या वडिलांची मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी सकाळी धाव घेतली होती व या प्रकरणी तातडीच्या सुनावणीची मागणी केली होती. अंत्यसंस्कारासाठी दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याने जागा देण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली, त्यांनी हे निर्देश दिले.
मात्र या जागेबाबत जाहीर माहिती न देता जागा निश्चित झाल्यावर अक्षयच्या कुटुंबीयांना त्याची माहिती देण्यात यावी असे निर्देश न्यायालयाने दिले. सोमवारपर्यंत त्याचे दफन करण्यात यावे असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होईल. सरकारी वकील वेणेगावकर यांनी राज्य सरकारतर्फे जागा शोधण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
नक्की वाचा - अख्ख्या बदलापुरात अक्षय शिंदेच्या मृतदेहाला जमीन मिळेना, वडिलांची पोलिसात धाव
अंबरनाथ नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात अक्षयच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली. अॅड अमित कटारनवरे यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली. बदलापूर येथील व जवळील सर्व स्मशानभूमीमध्ये अक्षयला दफन करण्यासाठी जागा देण्यास स्थानिक पातळीवरुन विरोध होत असल्याची माहिती सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला दिली. आरोपीच्या समाजात मृतदेहाला दफन केले जात नाही, असे सरकारी वकिलांनी सांगितले मात्र ही मृताच्या आईवडिलांची इच्छा असल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले व सरकारी वकिलांचा युक्तिवाद खोडून काढला. भविष्यात या प्रकरणी काही गरज भासली तर मृतदेह दफन केल्यास पुन्हा काढता येईल, त्यामुळे दहन करण्याऐवजी दफन करण्याचा निर्णय कुटुंबातर्फे घेण्यात आला.
सोमवारी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडल्याचं सांगितलं. मात्र कोर्टाने हा एन्काऊंटर नसल्याचं निरीक्षण नोंदवलं. पुढील तपासणी करण्यासाठी अक्षय शिंदेच्या मृतदेहाची गरज भासू शकते, असं अक्षयच्या वकिलांकडून सांगण्यात आलं आहे.
नक्की वाचा - Akshay Shinde Encounter : 'अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही', उच्च न्यायालय म्हणाले...
अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी म्हणून अक्षय शिंदेच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अक्षयच्या मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा पालकांचा आरोप आहे. 26 सप्टेंबर रोजी अक्षय शिंदेच्या पालकांनी अंबरनाथ हिंदू स्मशानभूमीत जागा पाहिली होती. मात्र अंबरनाथ पालिकेने दफन विधीसाठीचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world