जाहिरात
4 days ago

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव लवकरच राजकीय इनिंग सुरु करण्याची शक्यता आहे. आजवर क्रिकेटचं मैदान गाजवलेला केदार राजकीय आखड्यात प्रवेश करणार आहे. केदार जाधव भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये केदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आज मंगळवारी मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात केदार जाधव भाजपाच प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची शक्यता आहे.

Live Update महात्मा फुले यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर

महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.ब्राह्मण महासंघाच्या आक्षेपानंतर दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी तारीख पुढे ढकलली आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन 15 दिवस लांबणीवर पुढे नेलं आहे. या काळात महादेवन ब्राह्मण महासंघाशी चर्चा करणार आहेत.  

महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांवर आनंद दवे यांनी आक्षेप घेतला होता.  हा चित्रपट समाजात तेढ निर्माण करेल असा आरोप दवे यांनी केला होता.

याच आक्षेपानंतर दिग्दर्शकांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख 15 दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. 

Live Update : मुंबईतील एलफिस्टन पूल 2 वर्षांसाठी बंद राहणार

मुंबईतील एलफिस्टन पूल 10 एप्रिल पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. पुढील दोन वर्ष हा पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पुलाच्या नूतनीकरण कामासाठी, तसेच शिवडी ते वरळीपर्यंत फ्लायओव्हर कामासाठी हा पूल बंद करण्यात येणार आहे.मध्य मुंबईच्या पूर्व पश्चिम भागाला जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा एलफिस्टन पूल मानला जातो. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे

2 दिवसात थकबाकीचे 22 कोटी भरा, मंगेशकर रुग्णालयाला पुणे मनपाची नोटीस

2 दिवसात थकबाकीचे  22 कोटी भरा अशी नोटीस दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेने पाठवली आहे. जर ही थकबाकी भरली नाही तर  जप्तीची कारवाई केली जाईल असं मनपाने स्पष्ट केलं आहे.  रुग्णालयाची एकूण थकबाकी ही 27 कोटी  आहे. त्यापैकी 22 कोटी भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  जर कर भरला नाही तर जप्तीची करवाई दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 

प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या न्यायालय निर्णय देणार

प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या न्यायालय निर्णय देणार आहे. कोरटकर सध्या कळंबा कारागृहात 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. जर जामीन मंजूर झाला तर कोरटकरला मोठा दिलासा मिळू शकतो. 7 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीतील वकिलांच्या युक्तिवादानंतर उद्या न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे. त्यामुळे कोरटकरला दिलासा मिळाल्यास मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात होण्याची शक्यता आहे.

पोहण्यासाठी गेलेले दोन कामगार बुडाले, कर्जत येथील घटना

कर्जत येथील हॉटेल रेडिसन मागील हॉटेलमध्ये काम करणारे दोन कामगार पोहण्यासाठी गेले असता दोघे जण बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह सापडला आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. 

नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खानला दोन दिवसांची पोलिस कोठडी

नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपी फहीम खान याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.  सायबर पोलिसांनी फहीमची पोलिस कोठडी घेतली आहे.  सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्ट संबंधात सायबर पोलिस त्याची चौकशी करतील. दरम्यान, फहीमच्या जामीन अर्जावर आता 17 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. जामीन अर्जावर आज देखील पोलिसांनी बाजू न नोंदविल्याने न्यायालयाने पोलिसांना आता नो से असल्याचे ग्राह्य धरले असून, जामीन अर्जावर 17 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

KKR vs LSG - लखनौची तुफान फटकेबाजी, कोलकाताला दिलं तगडं आव्हान

आयपीएल 2025 मध्ये   कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (KKR vs LSG) हा सामना सध्या सुरु आहे. या सामन्यात लखनौच्या बॅटर्सनी तुफान फटकेबाजी करत केकेआरसमोर विजयासाठी 239 रन्सचं आव्हान ठेवलं आहे. लखनौकडून निकोलस पूरननं 36 बॉलमध्ये नाबाद 87 रन्सची झंझावती खेळी केली. मिचेल मार्शनं 48 बॉल्समध्ये 81 रन्स करत त्याला भक्कम साथ दिली. या दोघांच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर लखनौनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 3 आऊट 238 रन्स केले.

2008 जयपूर सीरियल ब्‍लास्‍ट प्रकरणी 4 जणांना जन्मठेप

2008 जयपूर सीरियल ब्‍लास्‍ट प्रकरणी 4 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जवळपास 17 वर्षानंतर या प्रकरणात निकाला आला आहे. 2008 साली जयपूरमध्ये सलग आठ बॉम्ब ब्लास्ट झाले होते.  

सोलापुरात शाळेच्या बसमधून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

सोलापुरात शाळेच्या बसमधून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.  अनुराग तीपण्णा राठोड असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो 13 वर्षीचा आहे.  अनुराग राठोड हा शाळेतून येतं असताना बसमधून खाली पडला. त्याच्या डोक्यावरून बस गेली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. 

Live Update : खोक्या भोसलेची बायको आणि नातेवाईक अजित पवारांच्या भेटीला

सतिश भोसले उर्फ खोक्या भोसलेची बायको तेजू भोसले आणि त्यांचे नातेवाईक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आले आहेत. खोक्या भोसले आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर वनविभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे खोक्या भोसले आणि त्यांच्या नातेवाईकांच कुटुंब हे उघड्यावर आलं आहे

Live Update : कुणाल कामराच्या याचिकेवर 16 एप्रिलला पुढील सुनावणी

कुणाल कामराच्या याचिकेवरती 16 एप्रिलला पुढील सुनावणी 

कुणाल कामरा यांनी खार पोलीस स्थानकातील गुन्हा रद्द करण्याची केली होती मागणी 

आज झालेल्या सुनावणी मध्ये 16 एप्रिलची तारीख देण्यात आली 

परंतु कुणाल कामराने मद्रास कोर्टातून 17 एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन मिळवलेला आहे

शेअर बाजारात कालच्या घसरणीनंतर आज चांगली सुरुवात, सेन्सेक्स 1137 अंकांनी

शेअर बाजारात कालच्या घसरणीनंतर आज चांगली सुरुवात झाली आहे. आशियाई शेअर बाजारांच्या चांगल्या संकेतांनंतर भारतीय बाजारही वाढीसह सुरु झाला. सेन्सेक्स 1136.69 अंकांच्या किंवा 1.59 टक्क्यांच्या वाढीसह 74,302.67 वर व्यवहार करताना दिसला. त्याच वेळी, निफ्टी 365.60 अंकांच्या म्हणजेच 1.65 टक्क्यांच्या वाढीसह 22,527.20 स्तरावर व्यवहार करताना दिसला.

प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, निफ्टी 22300 च्या वर

शेअर बाजारात उसळी, प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, निफ्टी 22300 च्या वर

Live Update : कोकण रेल्वे मार्गावर 11 एप्रिलपासून एसी स्पेशल ट्रेन धावणार

उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन  लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेस 11 एप्रिलपासून धावणार आहे. ही गाडी एकूण 22 एलएचबी तसेच संपूर्ण वातानूकुलित असेल. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लो. टिळक टर्मिनस ते करमाळी साप्ताहिक वातानुकूलित एक्स्प्रेस 11 एप्रिल ते 23 मे 2025 या कालावधीत दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 10 वा. 15 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी 12 एप्रिल ते 24 मे या कालावधीत करमाळी येथून सुटणार आहे. ही गाडी करमाळी येथून दुपारी अडीच वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वा. 5 मिनिटांनी ती मुंबईत लो. टिळक टर्मिनसला पोहचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी तसेच थिवी या स्थानकांवर थांबणार आहे.

Live Update : श्रीराम जयंतीच्या निमित्ताने मिरवणुकीत डेसिबल मर्यादा ओलांडल्यामुळे डॉल्बी मालकांवर 5 वेगवेगळे गुन्हे दाखल

धाराशिव शहरात श्रीराम जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवल्याच्या कारणावरून धाराशिव शहर पोलिसात पाच वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.  श्रीराम जयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत मोठ-मोठ्या डॉल्बी लावण्यात आल्या होत्या. या कर्णकर्कश्श आवाजाने आवाजाची डेसिबलची मर्यादा ओलांडली व मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण झाल्याने ही कारवाई करण्यात आली. डॉल्बी मालक यांची नावे व वाहन क्रमांक यांची नोंद घेण्यात आली आहे, परिवहन विभागाला हे वाहन क्रमांक कारवाईसाठी देण्यात येणार आहेत, यामुळे डॉल्बी मालकांना लाखो रुपयांचा दंड बसणार आहे. धाराशिव शहर एकेकाळी डॉल्बी मुक्त होते. मात्र ते पुन्हा डॉल्बी युक्त झाले, नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्यावर पोलीस अलर्ट मोडवर आले असून कारवाईला सुरुवात केली आहे.

Live Update : निलेश ओझा यांच्याविरोधात कोर्टाच्या सू मोटो याचिकेवर आज सुनावणी होणार

सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांच्याविरोधात कोर्टाने सू मोटो याचिका घेतली. आजच याचिकेवर तत्काळ सुनावणी होणार आहे. निलेश ओझा यांनी न्यायाधीशांविरोधात घेतलेली भूमिका त्यांना अडचणीची ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. निलेश ओझा यांनी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यावर अनेक  आरोप केले होते. आज मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी होणार आहे.

Live Update : आरोपी दत्तात्रेय गाडेची पोलीस कोठडी मिळण्यासाठी पुणे पोलिसांकडून पुन्हा सत्र न्यायालयात अपील

स्वारगेट बलात्कार प्रकरण

आरोपी दत्तात्रेय गाडेची पोलीस कोठडी मिळण्यासाठी पुणे पोलिसांकडून पुन्हा सत्र न्यायालयात अपील

स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडे याचा ताबा मिळवण्यासाठी आता पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे

गाडे याच्या पोलीस कोठडीसाठी पुणे पोलिसांनी अपील केलं आहे, आज त्यावर सुनावणी होणार आहे.

तर आरोपीच्या वकिरांना गाडेला भेटण्याची न्यायालयाने परवानगी दिली आहे