Navi Mumbai : नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडच्या काळात गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चेन स्नॅचिंग, घरफोडी, दिवसा फुटपाथवरून जाणाऱ्या पादचाऱ्यांची लूट, गांजा विकणे, मार्केटमध्ये शंभर ते दीडशे टप्प्यांवर बेकायदेशीर गुटखा विक्री चालू आहे. दुचाकी चोरीसारख्या गंभीर घटना दिवसाढवळ्या घडत असल्याने एपीएमसी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एपीएमसी मार्केट परिसर, सर्व्हिस रोड, माथाडी चौक, ट्रक टर्मिनल आणि आसपासच्या वसाहतींमध्ये गुन्हेगार खुलेआम वावरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांचं म्हणणं आहे की, पोलिसांचा गस्त वाढवण्याऐवजी गुन्हेगारांचे मनोबल अधिकच वाढले आहे. काही घटनांमध्ये सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळेत महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच लुटीच्या घटनांना सामोरं जावं लागत आहे. दुचाकी चोरीचं प्रमाणही वाढले असून काही वाहनं काही तासांतच गायब होत आहेत. यामुळे व्यापारी, कामगार आणि स्थानिक रहिवासी प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.
तक्रार दिल्यानंतरही तपासात दिरंगाई होते. पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने गुन्हेगार निर्भय झाले आहेत, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. रात्रीची गस्त अपुरी असून दिवसाच्या वेळेसही पोलिसांची दृश्य उपस्थिती कमी असल्याचेही निदर्शनास येत आहे. दरम्यान, एपीएमसी पोलीस प्रशासनाने तातडीने गस्त वाढवणे, संशयितांवर लक्ष ठेवणे, सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हेगारांचा शोध घेणे आणि नागरिकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी होत आहे. अन्यथा, नागरिकांना रस्त्यावर चालणेही धोकादायक ठरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.