- जळगाव जिल्ह्यातील अकुलखेडा गावात विवाहित महिलेची प्रेमसंबंधातून हत्या करण्यात आली होती
- अनिता पाटील आणि देवा धनगर यांच्यात सोशल मीडियावरून ओळख झाली आणि त्यांचे पाच वर्ष प्रेम संबंध होते
- देवाने अनिताच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली आणि नंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली
मंगेश जोशी
Jalgaon News: तीचं लग्न झालं होतं. तिला दोन मुलं ही होती. तिचं वय 30 होतं. तर त्याचं वय 26 वर्ष. त्याचं ही लग्न झालं होतं. सोशल मीडियावर दोघांची ओळख झाली. ओळख कधी प्रेमात बदलली दोघांनाही समजलं नाही. त्याची बायको त्याला सोडून ही गेली. पण त्याने तिची साथ काही सोडली नाही. पाच वर्ष हे नातं सुरू होतं. पण मध्येच काही तरी बिनसलं अन् या नात्याचं होत्याचं नव्हतं झालं. ही धक्कादायक जेव्हा उघड झाली त्यावेळी या नात्या मागची अनेक गुपीत समोर आली. ही घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. प्रेमात अखंड बुडालेला माणून काय करू शकतो याचीच प्रचेती यातून आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या अकुलखेडा गावात प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून एका विवाहित महिलेची गावठी पिस्तुलातून गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर विवाहित प्रियकराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकुलखेडा येथील रहिवासी जगदीश काशिनाथ पाटील यांच्या घरात त्यांची पत्नी अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी परतलेल्या मुलीने घरात प्रवेश करताच दोघांचेही मृतदेह पाहीले. तिने आरडाओरडा केल्याने शेजारी धावून आले. त्यानंतर घटनेची पोलिसांना माहिती दिली.
अनिता पाटील या विवाहित होत्या. त्या आपल्या पतीसह अकुलखेडा इथं राहात होत्या. त्यांचे देवा धनगर यांच्यासोबत प्रेम संबंध होते. त्यांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. याच कारणावरून रागाच्या भरात देवा धनगर अकुलखेडा येथे आला. तो थेट अनिता पाटील यांच्या घरी पोहोचला. तेथे त्याने गावठी पिस्तुलातून अनिता पाटील यांच्या थेट डोक्यात गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आपले जीवन संपवले.
घटनास्थळी आरोपीची दुचाकी आढळून आली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून शवविच्छेदनानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर सावळे करीत आहेत. घटनेमुळे अकुलखेडा परिसरात खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world