मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात विम्याच्या पैशांसाठी रचलेला धक्कादायक कट उघडकीस आला आहे. ५० लाख रुपयांच्या अपघाती विमा रकमेवर डोळा ठेवून मृत्यूचा बनाव रचल्याचे समोर आलं आहे. विशेष म्हणजे ज्याच्या नावावर विमा दावा करण्यात आला त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष मृत्यू अपघातात नव्हे, तर वर्षभर आधी गंभीर आजाराने झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची बनावट घटना तयार करून विमा कंपनीकडे दावा दाखल करण्यात आला होता.
मात्र विमा कंपनीने केलेल्या तपासात संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याचे उघड झाले. या कटामागे मृत व्यक्तीची पत्नीच सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. एवढेच नव्हे तर मृत व्यक्तीच्या नावावर सुमारे दहा वेगवेगळ्या विमा पॉलिसी असल्याचेही आढळले आहे. या प्रकरणात विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, तसेच चाळीसगाव व मेहुनबारे पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकूण नऊ आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. तर विम्याच्या पैशांसाठी मृत्यूचाच बनाव रचल्याच्या या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
५० लाखांचा अपघाती विमा रकमेवर डोळा ठेवून मृत्यूची बनावट कहाणी
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्यावर दुचाकी अपघातात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बनाव करून ५० लाख रुपयांचा अपघाती विमा मिळवण्याचा नाट्यमय कथानक तयार करण्यात आले. या कथित अपघाताच्या आधारे मृत व्यक्तीच्या नावाने विमा कंपनीकडे दावा दाखल करण्यात आला. राजेंद्र शालिंदर जाधव असं मृत व्यक्तीचं नाव असून त्याचा या अपघातात मृत्यू झाल्याचे दर्शवण्यात आले व त्यांच्या नावाने राजेंद्र जाधव यांच्या पत्नी अरुणा जाधव यांनी श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे ५० लाख रुपयांच्या एक्सिडेंट विम्याचा क्लेम केला.
१९ एप्रिल २०२५ रोजी रात्री दहिवद येथून मालेगावकडे जात असताना राजेंद्र जाधव यांच्या दुचाकीला काळ्या रंगाच्या थार वाहनाने धडक दिली आणि त्या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याचे दाखवण्यात आले. तसेच या अपघातानंतर त्यांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले. या कथित अपघाताच्या आधारावर पोलिसांकडून प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आणि रुग्णालयातून पोस्टमार्टम अहवालही देण्यात आला. विशेष म्हणजे, तपासात असे समोर आले की हे सर्व कागदपत्रे मृतदेह प्रत्यक्ष समोर नसतानाही तयार करण्यात आले होते. या आधारे मेहुनबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व करत असताना या कटात थार वाहन चालक, विमा प्रतिनिधी, उपचार करणारा डॉक्टर, गुन्हा नोंद करणारे पोलीस तसेच फिर्यादी मृत व्यक्तीची पत्नी व भाऊ हे सहभागी होते. दरम्यान, विमा कंपनीला या प्रकरणात संशय आल्याने त्यांनी एका खाजगी तपास यंत्रणेमार्फत चौकशी सुरू केली. या चौकशीत अनेक धक्कादायक विसंगती समोर आल्या.
विमा कंपनीत खळबळ...
या प्रकरणात मृत व्यक्तीची पत्नी अरुणा राजेंद्र जाधव, संभाजी जाधव, वाहनाचा चालक आणि मालक, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर, तसेच मेहुनबारे आणि चाळीसगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, सुनील निकम, रवींद्र बत्तीसे, सचिन निकम, यांच्यासह विमा एजंट प्रवीण पाटील, प्रेम पाटील आणि मृताचा भाऊ मिथुन जाधव यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे विमा फसवणुकीच्या गंभीर प्रकारांबाबत प्रशासन आणि विमा कंपन्यांमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world