- कल्याणमध्ये गणपत छत्रपती या व्यक्तीने महिलेसमोर अश्लील कृत्य केलं
- घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे
- कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात अशा प्रकारच्या घटनांचा वाढत आहेत
अमजद खान
भररस्त्यात एका महिलेसमोर अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी गणपत छत्रपती याला महात्मा फुले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याणमध्ये अलीकडच्या काळात अशा घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये खास करून महिलांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात एक महिला रस्त्याने जात होता. त्यावेळी संबंधित व्यक्ती तिच्यासमोर आला. त्याने महिलेकडे पाहून अश्लील कृत्य केले. त्यानंतर तिथून त्याने पळ काढला. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधित व्यक्तीला पकडून चोप दिल्याची माहिती समोर आली आहे. महात्मा फुले पोलिसांनी आरोपी गणपत छत्रपती याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी कल्याणच्या जोशीबाग परिसरातही एका तरुणीसोबत असाच प्रकार घडला होता. त्या प्रकरणातही पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. मात्र अल्प कालावधीत अशा घटना पुन्हा घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, स्टेशन परिसरात बेशिस्त रिक्षाचालक, अनधिकृत फेरीवाले, नशेखोर आणि मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या व्यक्तींचा वावर वाढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह महिलांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.
महात्मा फुले पोलिसांकडून स्कायवॉक आणि स्टेशन परिसरात विशेष कारवाई सुरू असतानाच ही घटना घडली. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. याबाबत कल्याण युवक काँग्रेसचे अध्यक्ष जपजीत सिंह यांनी सांगितले आहे की या परिसरात पोलिसांची कारवाई सुरू आहे. मात्र ती कारवाई पुरेशी नाही. या प्रकरणात ठोस कारवाई केली पाहिजे. आज जो प्रकार घडला आहे तो निंदनीय आहे. बेशिस्त रिक्षा चालक आणि नशा करणाऱ्या व्यक्तींमुळे या परिसरात खूप त्रास वाढला आहे. नागरिकांसोबत व्यापारी वर्गाला देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे असं ही ते म्हणाले. या प्रकरणी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा ही दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world