Kalyan News : कल्याण पश्चिमेकडील गांधारी गावात राहणारे अशोक लोखंडे यांच्या राहत्या घरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेकांच्या घरात उंदीर सापडतात, कुणाकडे झुरळ-पाल आढळतात. मात्र अशोक लोखंडे यांच्या घरात चक्क नागाची पिल्ल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यांच्या घरात नागाच्या १५-२० पिल्लांचा वावर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. शेवटी सर्पमित्र कपिल कारभारी यांना बोलावण्यात आलं. त्यांनी एक एक करीत सर्व सापाची पिल्ल एका बादलीत जमा करून जंगलात सोडून दिली आहेत.
घराच्या कोपऱ्यात वळवळणारी नागाची २० पिल्लं...
कल्याण पश्चिमेकडील गांधारी गावात अशोक लोखंडे आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या घरातील एका कोपऱ्यात सापाची वळवळणारी पिल्ले आढळून आल्याने लोखंडे कुटुंबीय भयभीत झाले होते. या नागाच्या पिल्लांचे पालकही परिसरात असावेत. या पिल्लांच्या संपर्कात गेल्यास जीवास धोका उद्भवू शकतो, या विचारांनी भयभीत झालेले अशोक लोखंडे यांनी तत्काळ सर्पमित्राला नागाच्या पिल्लांविषयी माहिती दिली. माहिती कळताच कपिल कारभारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घराची पाहणी करून त्यांनी सर्व पिल्ले सुरक्षितपणे पकडली आणि एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये त्यांना बंद केले. त्यानंतर वनविभागाच्या नियमांनुसार ड्रममध्ये भरलेली ही पिल्ले शहरापासून दूर जंगलातील सुरक्षित अधिवासात नेऊन सोडली. नैसर्गिक अधिवासात पिल्ले सोडल्याने त्यांचे अस्तित्व टिकून राहण्यास मदत होईल, असे सर्पमित्र कपिल कारभारी यांनी सांगितले.
शहरीकरणामुळे अधिवास नष्ट
शहरीकरणामुळे सापांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जंगले, गवताळ प्रदेश, पाणथळ जागा, नद्या, इत्यादी सर्व प्रकारच्या वन्यजीव अधिवासांवर मानवी अतिक्रमण होत आहे. नाग किंवा त्यांसारखे प्राणी मानवी वस्तीत शिरकाव करतात. गांधारी गाव हे जंगलापासून काही अंतरावर आहे. अशोक लोखंडे यांच्या घरात आढळलेली पिल्ले अतिविषारी सर्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोब्रा नागाची असल्याने लोखंडे कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. गांधारी हे गावखेडे असल्याने या गावातील परिसरात वारंवार लहान-मोठे, बिनविषारी आणि विषारी साप आढळून येत असल्याच्या घटना घडत असतात.

सापांबद्दल जनजागृतीची गरज
सापांविषयी जनमानसांत भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे. मात्र साप हा शेतकऱ्यांचा मित्र तर आहेच, शिवाय तो निसर्गाचा अविभाज्य घटकही आहे. त्यामुळे त्याचं जतन करणं आवश्यक आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला साप मानवी वस्तीत शिरकाव करण्याच्या घटना वाढतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशिक्षित सर्पमित्राला बोलावून साप पकडून जंगलात सोडण्याची काळजी घ्यावी, असे आवाहन कपिल कारभारी यांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world