Kalyan News : हुंड्यासाठी छळ करत सासरच्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठत थेट सुनेचं टक्कल केल्याची संतापजनक घटना कल्याणच्या वालधुनी परिसरात घडलीये. या घटनेनंतर ही महिला सासरहून पळून माहेरी आली असून सध्या तिच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची दखल स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि या विवाहितेच्या सासरच्यांवर अतिशय कठोर कारवाई करावी, अशी आवश्यकता आहे.
हुंड्यासाठी अमानुष छळ
अफसाना अन्सारी असं या विवाहितेचं नाव असून ती मूळची उल्हासनगरला राहणारी आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये तिचं लग्न कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या समीर अन्सारी सोबत झालं. लग्न करताना आमची हुंडा देण्याची परिस्थिती नसल्याचं माहेरच्यांनी सासरच्यांना सांगितलं होतं, मात्र तरीही लग्न झाल्यानंतर महिन्याभराने अफसानाचा हुंड्यासाठी अमानुष छळ सुरू झाला. अफसाना गर्भवती असतानाही तिला जेवण न देणं, घरातलं जेवण फ्रिजमध्ये ठेवून देणं, अमानुष मारहाण करणं, गरम पाण्याने हात जाळणं, कोणत्याच गोष्टीसाठी पैसे न देणं असे प्रकार आपल्यासोबत झाल्याचं अफसानाने सांगितलं. मात्र माहेरची परिस्थिती गरीब असल्यानं तिने हे सगळं सहन केलं.
डोक्यात उवा झाल्याचं म्हणत चक्क केलं टक्कल
मात्र तिच्या सासरच्यांनी ७ जून रोजी डोक्यात उवा झाल्याचं म्हणत चक्क तिचं टक्कल केलं. हा छळ असह्य झाल्यानं अफसाना ही घरातून पळून तिच्या बहिणीकडे गेली आणि भावाला फोन करून आपल्या छळाची माहिती दिली. यानंतर तिचा भाऊ नीर हसन अन्सारी याने तिला तिला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलंय. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या प्रकरणाची आता मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, आणि अफसानाच्या सासरच्यांवर अतिशय कठोर कारवाई व्हावी, अशी आवश्यकता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world