
अमजद खान, प्रतिनिधी
रुग्णवाहिकेला पाच तास उशीर झाल्यानं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) रुक्मीणीबाई रुग्णालयाच्या दारातच एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी मोठी कारवाई केली आहे. त्यांनी चार कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. कंत्राटी पद्धतीवर असलेल्या एका मेडिकल ऑफिसरसह एका स्टाफ नर्सला कमावरुन कमी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
इतकेच नाही तर, आयुक्त अभिनव गोयल यांनी एक सामान्य नागरीक बनून केडीएमसीच्या रुग्णालयास भेट दिली. स्वत:चा केस पेपर काढून रुग्णालयातील आरोग्य सेवेचा आढावा घेतला. त्यावेळी आयुक्तांची ओळख पटल्यानंतर रुग्णालयातील स्टाफला मोठा धक्काच बसला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
कल्याण पूर्वेत राहणाऱ्या सविता बिराजदार या महिलेला केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलविण्यास डॉक्टरांनी सांगितले. मात्र त्यांना कळवा रुग्णालया नेण्याकरीता वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. तब्बल पाच तास रुग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत असलेल्या महिलेचा रुग्णालयाच्या दारात मृत्यू झाला. या घटनेनंतर महापालिकेच्या रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा कारभार पुन्हा एकदा समोर आला होता.
( नक्की वाचा : Kalyan : 'कल्याणच्या शाळेत महिला विश्वस्तांकडून अश्लील कृत्य सुरु' माजी नगरसेवकाचा खळबळजनक आरोप )
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केडीएमसी आयुक्त गोयल यांनी आरोग्य खात्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांना दिले होते.उपायुक्त बोरकर यांनी या प्रकणातील चौकशीचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला. या अहवालानंतर आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात रुग्णवाहिका चालक हरिश्चंदर यशवंतराव, प्रमोद लासूरे, वाहन चालक मारुती निकम, सिस्टर इनचार्ज जयश्री रायकर यांना सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. तर कंत्राटी पद्धतीवर असलेले मेडिकल ऑफिसर डॉक्टर उमर पटेल आणि स्टाफ नर्स नमिता भोये यांना सेवेतून कमी करण्यात आले.

आयुक्तांनी रुक्मीणीबाई रुग्णालयात सामान्य नागरिक या नात्यानं अचानक भेट दिली. त्यांनी स्वत: केस पेपर काढून रुग्ण असल्याचे सांगितले. यावेळी ओपीडी वेळेवर सुरु झाली नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यांनी या प्रकरणी रुग्णालयातील स्टाफला चांगलेच धारेवर धरले.
आरोग्य सेवा सामान्य नागरिकांना पुरविताना कोणताही हलगर्जीपणा सहन होणार नाही. असा कोणताही प्रकार घडल्यास संबंधित जबाबदार असलेल्या दोषींची कोणतीही गय गेली जाणार असा सज्जड इशारा आयुक्तांनी रुक्मीणीबाई रुग्णालय व्यवस्थापनास दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world