त्रिशरण मोहगावकर, प्रतिनिधी
Latur News : लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी येथील एका 22 वर्षीय तरुणाने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चार वर्षांपूर्वी मित्रांच्या नादी लागून केलेल्या एका चुकीचा शिक्का इमरान खलील बेलुरे याच्या कपाळावर असा बसला की, त्याने थेट मृत्यूला जवळ केले. आत्महत्येपूर्वी इमरानने एक व्हिडिओ बनवून त्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या जाचाचा उल्लेख केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण निलंगा तालुक्यात खळबळ माजली असून संतप्त ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून आरोपी पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे.
एका चुकीची मोठी किंमत
इमरान खलील बेलुरे हा तरुण चार वर्षांपूर्वी एका दुकानात मुनीम म्हणून कामाला होता. त्यावेळी मित्रांच्या संगतीमुळे त्याने आपल्याच मालकाच्या दुकानात चोरी केली होती. ही चोरी पकडली गेली आणि चोरीचा सर्व मुद्देमालही परत करण्यात आला.
मात्र, या एका घटनेने इमरानच्या आयुष्याला कलाटणी दिली. तेव्हापासून त्याच्यावर चोराचा शिक्का बसला आणि तिथूनच त्याच्या मानसिक छळाला सुरुवात झाली. कोणतीही चोरी झाली की संशयावरून पोलिसांनी त्याला उचलणे ही जणू काही नेहमीचीच गोष्ट झाली होती.
( नक्की वाचा : Nagpur News : मित्राचं लग्न ठरलं, पार्टी झाली पण 'तो' परतलाच नाही; 11 मित्रांचा बेजबाबदारपणा CCTV मध्ये कैद )
पोलिसांचा जाच आणि सामाजिक अपमान
परिसरात कुठेही चोरी झाली की पोलीस इमरानला चौकशीसाठी घेऊन जात असत. रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेली पोलिसांचे वाहन त्याला घरातून उचलून रात्रभर फिरवत असे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. बाहेर पडलो तर पोलीस पकडतील या भीतीने इमरान घरातच बसून राहत होता. मात्र, तरुण मुलगा घरी बसून असल्याने आई-वडीलही कामावर जाण्यासाठी त्याला टोमणे मारत असत. एकीकडे पोलिसांचा ससेमिरा आणि दुसरीकडे घरच्यांचे बोलणे अशा दुहेरी कात्रीत इमरान अडकला होता. या सततच्या तणावामुळे तो मानसिकदृष्ट्या खचून गेला होता.
व्हिडिओ बनवून संपवलं आयुष्य
पोलिसांचा त्रास जेव्हा असह्य झाला, तेव्हा इमरानने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्याने गळफास घेण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओमध्ये त्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख करत, त्यांच्या त्रासामुळेच आपण हे पाऊल उचलत असल्याचे सांगितले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्याने फाशी घेऊन आपले जीवन संपवले. इमरानच्या या कृतीने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात संतापाची लाट पसरली आहे.
( नक्की वाचा : Pune News : 9 वीच्या मुलीनं चक्क शिक्षिकेला केलं प्रपोज, मैत्रिणीला वॉशरुममध्ये गाठले आणि... पुणे हादरले! )
गावकऱ्यांचा संताप आणि पोलीस छावणीचे स्वरूप
इमरानच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक आणि औराद शहाजनी गावातील नागरिक आक्रमक झाले. जोपर्यंत संबंधित दोषी पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन होत नाही आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि औराद शहाजनी गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले.
या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे सुधाकर बावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मोठ्या फौजफाट्यासह गावात दाखल झाले. गावात पोलिसांच्या 10 ते 15 वाहनं तैनात करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर अंत्यविधी
नातेवाईक एफआयआरशिवाय मृतदेह घेण्यास तयार नव्हते, मात्र अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी हस्तक्षेप करत नातेवाईकांना विश्वासात घेतले. तुम्ही लेखी जबाब नोंदवा, आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर नातेवाईकांनी माघार घेतली आणि इमरानचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांच्या कडक बंदोबस्तातच इमरानवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका तरुणाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world