Nagpur News : नागपूरमध्ये एका बॅचलर पार्टीदरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राचं लग्न ठरल्याचा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र जमलेल्या मित्रांनी, त्याच गटातील एक मित्र बेशुद्ध पडलेला असताना त्याला मदत करण्याऐवजी पार्टी सुरू ठेवण्याला प्राधान्य दिलं. अकरा मित्रांच्या या धक्कादायक निष्काळजीपणामुळे 33 वर्षीय आदित्य मोहिते या तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला आहे.
माणुसकी विसरलेले मित्र आणि ती काळरात्र
ही घटना 16 नोव्हेंबर 2024 रोजी नागपूर जिल्ह्यातील एका फार्म हाऊसवर घडली. जोएल सिंग नावाच्या मित्राच्या लग्नानिमित्त बॅचलर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्व मित्र एकत्र जमले होते, खाण्यापिण्याच्या गप्पा रंगल्या होत्या. मात्र, याच दरम्यान आदित्य मोहिते हा तरुण अचानक बेशुद्ध होऊन खाली पडला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की, एकीकडे आदित्य जमिनीवर निपचित पडलेला आहे आणि दुसरीकडे त्याचे मित्र टेबलावर बसून पार्टीत मग्न आहेत. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, या अकरा मित्रांच्या घोळक्यात एक उच्चशिक्षित डॉक्टर देखील होता. परंतु, त्या डॉक्टर मित्रालाही आपल्या बेशुद्ध पडलेल्या सहकाऱ्याची वैद्यकीय तपासणी करावीशी वाटली नाही.
( नक्की वाचा : Pune News : 9 वीच्या मुलीनं चक्क शिक्षिकेला केलं प्रपोज, मैत्रिणीला वॉशरुममध्ये गाठले आणि... पुणे हादरले! )
चादरीत गुंडाळलं आणि....
पार्टीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या मित्रांनी जे केलं ते पाहून कोणाचेही मन सुन्न होईल. बेशुद्ध पडलेल्या आदित्यला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी, या मित्रांनी त्याला एका चादरीत गुंडाळलं आणि जनावरासारखं फरफटत नेऊन एका खोलीत टाकून दिलं. त्यानंतर हे सर्व मित्र पुन्हा पार्टीत सामील झाले आणि त्यांचा जल्लोष सुरूच राहिला.
रात्रभर आदित्य त्या खोलीत तडफडत होता की त्याचा श्वास कधी थांबला, याची कोणालाही फिकीर नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत कोणीही त्याची साधी विचारपूसही केली नाही.
( नक्की वाचा : Trending News : ग्राफिक डिझायनर झाला चोर,जोडीला भावी डॉक्टर;'बंटी-बबली'च्या भयंकर प्लॅननं पोलिसही चक्रावले )
भावाचा आक्रोश आणि पोलिसांची कारवाई
आदित्यचे मोठे भाऊ ॲडव्होकेट परीक्षित मोहिते यांनी सांगितलं की, आदित्यचा स्टील आणि लोखंडाचा व्यवसाय होता आणि त्याला पार्ट्यांची फारशी आवड नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांना फोन आला की आदित्य उठत नाहीये, तेव्हा त्यांनी तातडीने त्याला दवाखान्यात नेण्यास सांगितलं. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित केलं.
फार्म हाऊसचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या मित्रांचा बेजबाबदारपणा जगासमोर आला. या प्रकरणी खापा पोलिसांनी त्या अकरा मित्रांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे सर्व आरोपी मित्र अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world