जाहिरात

प्रियकराला मुलगी आवडत नव्हती, आईला 'क्राईम पेट्रोल' पाहून विकृती सुचली; मुलीचा गळा चिरला

या आईचे हात मुलीची हत्या करतानाही थरथरले नाही आणि तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून फेकून देतानाही थरथरले नाहीत.

प्रियकराला मुलगी आवडत नव्हती, आईला 'क्राईम पेट्रोल' पाहून विकृती सुचली; मुलीचा गळा चिरला
नवी दिल्ली:

आईची माया आणि मायेचे कवच हे जगातील सगळ्या संकटांपासून मुलांचे संरक्षण करणारे असते. आपल्या मुलांना कोणी नख लावण्याचा प्रयत्न केला तर कोणतीही आई चवताळून उठते.  मात्र याला अपवाद ठरलीय बिहारमधील एक घटना. बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका महिलेने तिच्या मुलीला गळा चिरून ठार मारलं. असं करताना तिच्या डोळ्यात ना अश्रू होते ना मनात पश्चातापाची भावना. या आईचे हात मुलीची हत्या करतानाही थरथरले नाही आणि तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून फेकून देतानाही थरथरले नाहीत. पोलिसांनी या निर्दयी मातेला अटक केली आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना कळाले की या महिलेला क्राईम पेट्रोल पाहण्याचे व्यसन लागले होते. 

मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मिठनपुरा येथील रामबाग परिसरात 24 ऑगस्ट रोजी एका लहान मुलीचा मृतदेह सापडला होता. एका सूटकेसमध्ये कोंबलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला होता. पोलिसांना सदर प्रकार कळाल्यानंतर त्यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान हा मृतदेह जानकी वल्लभ शास्त्री मार्गावरील मनोज कुमार यांच्या मुलीचा असल्याचे कळाले. मिस्टी असं या मुलीचं नाव होतं आणि ती तीन वर्षांची होती. पोलिसांनी जेव्हा मिस्टीच्या घराची पाहणी केली तेव्हा त्यांना जमिनीवर रक्ताचे डाग दिसले होते. घरातल्या सिंकमध्ये आणि छतावरही रक्ताचे डाग दिसले होते. मनोज कुमार यांची पत्नी आणि मिस्टीची आई काजल ही गायब झाली होती.पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मनोज कुमार यांनी सांगितले की ज्या दिवशी ही घटना घडली होती तेव्हा काजल तिच्या मावशीकडे जाते असे सांगून घरातून निघून गेली होती.  

पोलिसांनी काजलला शोधून काढण्यासाठी विशेष तपास पथकाची निर्मिती केली होती. या पथकाने तांत्रिक आणि इतर मार्गांच्या सहाय्याने तपास करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांना पहिला संशय हा मिस्टीची आई काजलवरच होता. पोलिसांनी तिला शोधून काढत तिची चौकशी केली. यामध्ये तिने आपला गुन्हा कबूल केला. काजलने पोलिसांना सांगितलं की तिनेच मिस्टीची हत्या केली आहे. काजलने हे देखील सांगितले की तिला क्राईम पेट्रोल पाहण्याचे व्यसन लागले होते. क्राईम पेट्रोलचाच भाग पाहून तिला मिस्टीचा खून करण्याची कल्पना सुचली होती. 

मुझफ्फरपूरचे पोलीस अधीक्षक अवधेश सरोज दिक्षीत यांनी सदर प्रकरणाबाबत बोलताना सांगितले की, काजलचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. काजलच्या मुलीसह तिला सोबत ठेवण्यास तिचा प्रियकर तयार नव्हता. कालपरवा भेटलेल्या तरुणासोबत जीवन कंठता यावे यासाठी काजलने पोटच्या मुलीला ठार मारले. 23 ऑगस्ट रोजी काजलने मिस्टीचा खून केला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी मिस्टीचा मृतदेह सूटकेसमध्ये भरून तिने घराच्या मागच्या बाजूला  सूटकेस फेकून दिली होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com